नाशिक : राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात भ्रष्टाचार व अनागोंदी कारभार होत असल्याच्या प्राप्त झालेल्या तक्रारीने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या तक्रारीत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापासून विविध सचिव आणि आरटीओचे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले होते. पंढरवाड्याच्या नाशिक पोलिसांच्या चौकशीअंती याबाबतचा कुठल्याही प्रकारचा गुन्हा शहर आयुक्तालयाच्या हद्दीत घडला नसल्याचे प्रशासनाने मंगळवारी (दि.22) स्पष्ट केले आहे.
राज्याच्या मंत्र्यांपासून उच्चपदस्थ अधिकारीवर्गांपर्यंत भ्रष्टाचाराचे आरोप करणारी तक्रार आरटीओचे निलंबित मोटार निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची गंभीरपणे दखल घेत पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय बारकुंड यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त करत सखोल चौकशीचे आदेश दिले होते. 27 मे पासून याप्रकरणी चौकशीला सुरुवात झाली होती. दोनदा मिळालेल्या मुदतवाढीनंतर गुन्हे शाखेने पंधरवड्यात चौकशी पूर्ण केली आहे. या दरम्यान राज्याच्या अवर सचिव, उपसचिवांपासून नाशिक, धुळे, जळगाव आदी जिल्ह्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, आरटीओची कामे करणारे खासगी व्यक्ती आणि तक्रारदार असे सुमारे 35पेक्षा अधिक लोकांची कसून चौकशी करण्यात आली. सुरुवातीपासून यामध्ये क्लिष्टता, गुंतागुंत आढळून येत होती.
तक्रारदार पाटील यांच्याकडूनही प्रारंभी हवे तसे सहकार्य पोलिसांना मिळत नव्हते. मात्र दुसऱ्या दिवसापासून पाटील यांनी त्यांच्याकडे आरोपांशी निगडित विविध पुरावे सादर करण्यास सुरुवात केली होती. चौकशी लांबणीवर गेल्याने यामधून नेमके काय बाहेर येणार? पोलीस आयुक्त काय अहवाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. चौकशी सत्र गेल्या शनिवारी (दि. १२) समाप्त झाले होते.
गुन्हे शाखेच्या चौकशी अहवालाची पडताळणी पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्याकडून बारकाईने करण्यात येत होती. त्यांनी दहा दिवसांत चौकशी अहवाल, तक्रारदाराने दिलेले पुरावे यांची शहानिशा केली. या तक्रारीत करण्यात आलेल्या आरोपानुसार नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडला नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे पांडेय यांनी स्पष्ट केले. तक्रारीतील अन्य तथ्यांबाबतचा सविस्तर अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला असल्याचे पांडेय यांनी सांगितले.