मुंबई : राज्यात सागरी वाहतूक आणि त्याद्वारे पर्यटनाला चालना देण्यासाठी जल वाहतूक महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डच्या बैठकीत आज घेण्यात आला. राज्यात सुमारे चारशेहून अधिक जेट्टी आहेत. यातील काही जेट्टी या सुस्थितीत असून काहींची दुरु स्ती आवश्यक आहे. प्रवासी वाहतूक, क्रुझ शिपींग, वॉटरस्पोर्टस, रो-रो सेवा मालवाहतूक इत्यादीच्या वापरासाठी खासगी उद्योजकांना सुस्थितीतील जेट्टी देण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. याशिवाय इतर जेट्टींच्या विकासासाठी जल वाहतूक महामंडळाची स्थापना करण्यात येणार असून त्यासंदर्भात सल्लागाराची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. निर्मल सागरतट अभियाननिर्मल ग्रामच्या धर्तीवर आता सागरी किनाऱ्यावर ‘निर्मल सागरतट अभियान’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रत्येक गावात व्यवस्थापन संस्था स्थापन करून त्यामध्ये ग्रामस्तरावर सागरतट व्यवस्थापन समिती आणि जिल्हा स्तरावर जिल्हा सागरतट व्यवस्थापन समिती निर्माण करण्यात येणार आहेत. तसेच या योजनेत स्थानिकांना सहभागी करून घेण्यात येईल. त्यातून किनाऱ्याचे संरक्षण, किनारा स्वच्छता, कौशल्य विकास, सागरी वाहतूक व जलक्रीडेद्वारे पर्यटनात वाढ करणे, तसेच कांदळवन व कोरल्स यांचे संवर्धन आदी उपक्र म राबविण्यात येतील. त्यासाठी प्रत्येक समितीला निधी देण्यात येईल. सागरी प्रशिक्षणासाठी मेरीटाईम संशोधन प्रशिक्षण झोन निर्माण करण्यासही मुख्यमंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली. महाराष्ट्र मायनर पोर्टस् नियमानुसार प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व प्रकारच्या बोटींसाठी परवाना लागू करणे व सुधारित शुल्क आकारणे, लहान बंदरांमधील फेरी बोट, रो- रो बोटींचा वापर करून माल वाहतूकीचे दर वाढ करणे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या बांद्रा कुर्ला संकुलातील प्रशासकीय इमारतीस वाढीव चार चटई क्षेत्र देणे, भूसंपादनासाठी कर्मचारी भरती करणे आदी प्रस्तावांनाही यावेळी मंजुरी देण्यात आली. (विशेष प्रतिनिधी)
पर्यटनवृद्धीसाठी जलवाहतूक महामंडळ
By admin | Published: May 06, 2016 2:16 AM