लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मासुंदा तलावास लागून असलेल्या कचराकुंड्यांची साफसफाई महापालिकेने केली नसल्याने जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला ठाणेकरांच्या पायात अडकला. तुडुंब भरलेल्या कुंड्यांमधील कचऱ्यामुळे तलावाचा फेरफटका मारणाऱ्यांना परिसरातील दुर्गंधीचाही सामना करावा लागला.मासुंदा तलावाच्या संवर्धनासाठी सुमारे एक महिन्यापूर्वी व आज सकाळी मानवी साखळी तयार करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश ठाणेकरांनी आजही दिला. यामध्ये ठाणे महापालिकेचादेखील महत्त्वाचा सहभाग होता. मात्र, याच मानवी साखळीत सहभागी झालेले घंटाळीदेवी परिसरातील ज्येष्ठ नागरिक महेंद्र मोने यांनादेखील कचऱ्यांच्या घाणीला तोंड द्यावे लागले. त्यांनी वेळीच कचराकुंड्या, दुर्गंधी पसरवणारा गाळ, झाडांच्या तोडलेल्या फांद्यांचे छायाचित्र काढून महापालिकेचे हे ‘कर्तृत्व’ महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. कचरा एकवेळ नागरिकांनी टाकला असेल, पण कत्तल केलेली झाडे आणि तलावातील गाळ तर नागरिकांनी टाकलेला नाही ना? तो वेळीच उचलून परिसरातील पर्यावरणाचे संतुलन राखणे अपेक्षित आहे. शहराच्या स्वच्छतेबाबत महापालिकेने सर्वांचे सहकार्य व मदत मागितलेली आहे; पण महापालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याचे मोने यांनी सांगितले. >अक्षम्य दुर्लक्ष तलावाभोवतालचे तोडलेली झाडे, गणेशघाटातील दुर्गंधी, काठावर काढलेला गाळ, कचराकुंड्यांतील घाण आदींकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. हे सारे दुर्दैवी असल्याचे मोने यांनी आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले. ठाणे महानगरपालिकेला जागतिक पर्यावरणदिनाच्या पूर्वसंध्येलाही शहर स्वच्छ ठेवण्यात अपयशच आल्याने स्वच्छता अभियान फक्त कागदावर दाखवण्यापुरतेच आहे का, असा सवाल उपस्थित झाला आहे.
मासुंद्यात पायात अडकला कचरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2017 3:21 AM