नवी मुंबई : घनकचऱ्याचे नियोजन करण्याचे आव्हान पनवेल महापालिकेसमोर उभे राहिले आहे. ओएनजीसी गेट ते काळुंद्रेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मध्यभागी कचरा टाकला जात आहे. पूर्ण रस्ता कचऱ्याचे व्यापला असून हा परिसर कचरामुक्त करण्यात पालिकेला अपयश आले आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कचरा उचलण्यासाठी सक्षम यंत्रणा नाही व उचललेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी क्षेपणभूमीचीही व्यवस्था नाही. शहरात कचरा साठविण्यासाठी पुरेशा कचरा कुंड्या उपलब्ध नाहीत. महापालिकेत सहभागी झालेल्या गावांमधील कचरा अद्याप रोडवर जागा मिळेल तेथे टाकला जात आहे. पनवेलवरून अलिबागकडे जाणाऱ्या रस्त्यावर ओएनजीसीच्या गेटपासून काळुंद्रे परिसराकडे जातानाही ओएनजीसीच्या भिंतीला लागून रोडवरच कचरा टाकला जात आहे. येथील उसुर्ली व काळुंद्रे परिसरातील कचरा या ठिकाणी आणून टाकला जात आहे. घनकचरा विभागाचे कर्मचारी कधी कचरा उचलतात तर कधी दोन ते तीन दिवस कचरा उचलला जात नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग तयार होत असून परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. एक ते दोन डंपर भरतील एवढा कचरा येथे साचला आहे. महापालिकेने परिसरात कचरा संकलनासाठी कुंड्या ठेवल्या नाहीत. यामुळे कचरा रस्त्यालगत टाकण्याशिवाय पर्याय नाही. महापालिका वेळेवर व नियमित कचरा उचलत नाही. शहरात इतर ठिकाणीही अशीच स्थिती आहे. सायंकाळपर्यंत कचरा न उचलल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
ओएनजीसी गेटजवळ कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2017 2:55 AM