पुणे : पुणे-मुंबई महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (एमएसआरडीसी) महामार्गावरील ओझार्डे या गावात ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. त्यामुळे महामार्गावरील अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांवर वेळीच उपचार होणार असल्याने त्यांना जीवदान मिळणार आहे.पुणे-मुंबई प्रवास जलद गतीने व सुखकर व्हावा, या उद्देशाने एमएसआरडीसीतर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र, महामार्गावरील अपघातांचे प्रमाण फारसे कमी झालेले नाही. महामार्गावर २००६ पासून २०१७ पर्यंत पाच हजारांहून अधिक अपघात झाले आहेत. त्यात तब्बल दीड हजार प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. महामार्गावर २०१८ या वर्षातही अनेक अपघात झाले असून, अनेकांना त्यात आपला जीव गमवावा लागला आहे.महामार्गावर अपघात झालेल्या काही अपघातग्रस्तांना वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी मृत्यू झाला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महामार्गावर ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी केली जात होती. त्यानुसार एमटीडीसीतर्फे लवकरच महामार्गावर पवना मेडिकल फाऊंडेशनच्या मदतीने ट्रॉमा केअर सेंटर सुरू केले जाणार आहे.ट्रॉमा केअर सेंटरसाठी साडेसात लाख खर्चमहामार्गावरील अपघातात गंभीररीत्या जखमी झालेल्या रुग्णांवर तत्काळ उपचार करण्याची आवश्यकता असते. ट्रॉमा केअर सेंटरच्या माध्यमातून रुग्णांवर तत्काळ उपचार करता येणार आहेत. तसेच या सेंटरमध्ये आवश्यक उपचार केल्यानंतर संबंधित रुग्णांना शहरातील मोठ्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी घेऊन जाता येईल. या ट्रॉमा केअर सेंटरसाठी सुमारे साडेसात लाख रुपये खर्च येणार आहे.
द्रुतगती मार्गावर ट्रॉमा सेंटर; एमएसआरडीसीचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 6:59 AM