विक्रेत्यास दणकापुणे : मोठ्या हौसेने २२ हजार ८०० रुपये मोजून विकत आणलेला मोबाईल एकही दिवस वापरता न आलेल्या ग्राहकाला ग्राहक मंचात न्याय मिळाला. मंचाने विक्री केलेल्या मोबाईल शॉप व सर्व्हिस सेंटरला मोबाईलची मूळ किंमत २२ हजार ८०० रुपये देण्याचा आदेश दिला तसेच एकही दिवस मोबाईल वापरता आला नाही यामुळे साहजिकच मानसिक त्रास झाल्याचे नमूद करीत यापोटी ५ हजार व तक्रारीचा खर्च म्हणून २ हजार, असे एकूण २९ हजार ८०० रुपये देण्याचा आदेश मंचाने दिला आहे. ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात, सदस्य मोहन पाटणकर व क्षितिजा कुलकर्णी यांच्या मंचाने निकाल दिला.या प्रकरणी निखिल विजयकुमार जाधव (रा. बोपोडी) यांनी तक्रार दिली आहे. आराध्या एंटरप्रायझेस (एरंडवणा) हे सर्व्हिस सेंटर व केन्शा मोबाईल शॉप (टिळक स्मारक मंदिरासमोर) या विक्रेत्याच्या विरुद्ध तक्रार दिली होती. विक्रेत्यांनी मोबाईल दुरुस्तही करून दिला नाही किंवा नवीन मोबाईलही दिला नाही. ग्राहक मंचाने यावर नुकसानभरपाईचा आदेश दिला. मोबाईल बदलून दिला नाही> जाधव यांनी केन्शा मोबाईल शॉपमधून २२ हजार ८०० रूपये देऊन मोबाईल विकत घेतला. मात्र, खरेदी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मोबाईल बिघडला. त्यामुळे त्यांनी विक्रेत्याकडे तक्रार केली, तेव्हा त्यांनी आराध्या एंटरप्रायझेस येथून मोबाईल बदलून मिळेल, असे सांगितले. > त्या वेळी एंटरप्रायझेसने मोबाईल बदलून न देता तात्पुरती दुरुस्ती केली व मोबाईल परत बिघडल्यास बदलून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याच दिवशी मोबाईल पुन्हा नादुरूस्त झाला तो त्यांनी मोबाईल अॅक्सेसरीसहित एंटरप्रायझेसकडे नेऊन दिला. त्यांनी मोबाईल मिळाल्याचे पत्रही तक्रारदारांना दिले; मात्र मोबाईल बदलून दिला नाही. त्यामुळे तक्रारदाराने नवा मोबाईल मिळावा म्हणून ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.
मोबाईल न वापरता येणे मानसिक त्रासच - ग्राहक मंच
By admin | Published: July 10, 2015 2:10 AM