काम करताना मनात खळबळ, अशांतता होतीच. असे का, हा विचार करीत असतानाच आपल्याला जे करायचे आहे, जी गोष्ट आपल्याला आनंद देईल त्या क्षेत्रात आपण नाही, हे परोमाला कळले. आता खरंच थांबायला हवे म्हणून परोमाने एक महिन्याचा ब्रेक घेतला.
बारावीपर्यंत शिक्षण घेताना पुढे कोणत्या क्षेत्रात जायचे, हे परोमा चॅटर्जीने ठरवलेले नव्हते. प्रभावी व्यक्तिमत्त्व, उत्तम संभाषण कौशल्य तिच्याकडे असल्यामुळेच सेवा क्षेत्रात (हॉस्पिटॅलिटी) करिअर करायचे तिने ठरवले. यामुळेच बारावीनंतर सेवा क्षेत्रातील अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. पण अवघ्या सात महिन्यांतच एका विमान कंपनीमध्ये तिला नोकरी मिळाली. पहिले काही महिने ग्राउंडला काम केल्यावर तिला एअर होस्टे्स म्हणून काम करण्याची संधी मिळाली. एका महिन्यातच इंटरनॅशनल टूर करण्याची संधी तिला मिळाली. एअर होस्टेस म्हणून कार्यरत असताना तिला गलेलठ्ठ पगार होता. आर्थिकदृष्ट्या परोमा स्थिरावली होती. पण पुढे काय, हा प्रश्न तिला भेडसावू लागला. या नोकरीत पैसा होता, लाइफस्टाईल चांगली होती. तरीही मनात अस्वस्थता होती, काय करावे हे सुचत नव्हते. पण एक दिवशी ‘आता ही नोकरी सोडायची’ हे तिने मनाशी पक्के केले. आणि परोमाने कोणतीही आगाऊ सूचना न देता एअर होस्टेसची नोकरी सोडून दिली. यानंतर नुसते घरी बसून राहण्यापेक्षा क्लायंट सर्व्हिस क्षेत्रात नोकरी पकडली. तरीही काहीतरी कमी असल्याचे तिला जाणवत होते. आता खरंच थांबायला हवे म्हणून परोमाने एक महिन्याचा ब्रेक घेतला. या एका महिन्यात कुठेच नोकरी किंवा इतर काहीही काम करायचे नाही, असे तिने ठरवले. या वेळी आपल्याला काय हवे आहे, कोणती गोष्ट आपल्याला आनंद, आत्मिक समाधान देते याचा शोध सुरू झाला. त्या वेळी लहानपणापासून असलेली गाण्याची आवड तिच्या लक्षात आली. भावाला आवड असल्यामुळे परोमावरही गाण्याचे काही संस्कार झाले होते.विविध गाणी ऐकणे हा फक्त छंद नाही, तर गाणी ऐकवणे हे आपले करिअर होऊ शकते, हे परोमाला २०११ मध्ये उमजले. डीजे म्हणून करिअर करायचे ठरले. या क्षेत्राविषयी काहीच माहिती नसल्याने तिने इंटरनेटचा आधार घेतला. तिथून प्राथमिक माहिती मिळवली. यानंतर केनियाच्या एका डीजेकडून तिने सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. परीक्षा म्हणून तिला २० मिनिटांचा परफॉर्मन्स द्यायचा होता. परीक्षेत १००पैकी ९५ गुण मिळाले. त्याचवेळी सरांनी तिला सांगितले, की करिअर म्हणून पुढे नाही केलेस तरीही आवड म्हणून नक्कीच जोपास. परीक्षेत चांगले गुण मिळाले याचा आनंद होताच आणि ताणही वाढला. या क्षेत्रात कोणीच गॉडफादर नसल्यामुळे स्वत:च ओळखी काढणे, स्वत:ची ओळख निर्माण करणे असे सगळ्याच गोष्टी करायच्या होत्या. एका खासगी ठिकाणी सुरुवातीला डीजे म्हणून काम करायला सुरुवात केली. तिथे जास्त प्रमाणात कॉर्पोरेट पार्टीज व्हायच्या. हे चालू असतानाच परोमाने स्वत:ची मिक्सिंग करून यूट्युबला टाकली. यातूनच तिला नवीन वाटा मिळाल्या. फ्री लान्सर डीजे म्हणून तिने काम करायला सुरुवात केली. परेदशात डीजे म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यातच आयपीएल करण्याची संधी मिळाली. आयपीएल एक्स्ट्रा इनिंग्ज २०१४ची आॅफिशिअल डीजे म्हणून डीजे परामो हिने काम पाहिले आहे. या क्षेत्रात अनेक आव्हाने होती. तरीही आंतरिक समाधान आणि पॅशनमुळेच मी डीजे परोमा म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करू शकले.टर्निंग पाँइंट- पूजा दामले