कोरोना व्हायरसने चीन, युरोप, इटलीसह जगभरातील अनेक देशांमध्ये थैमान घातले आहे. भारतामध्ये देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून सर्वातप्रथम केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळून आले होते. यानंतर महाराष्ट्रात देखील कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ४१ वर जाऊन पोहोचला आहे. देशभरातील सर्वात जास्त कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आपल्या राज्यात आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्रात कोरोना व्हायरस येण्याबाबत सरकारने केलेलं थोडं दुलर्क्ष कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
देशात कोरोना व्हायरसचा प्रदुर्भाव पहिल्या टप्प्यात होता, त्यावेळी केंद्र सरकारने दिलेल्या सूचनांनूसार मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, इटली, सिंगापूर, इराण, दक्षिण कोरिया आणि जपान या देशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात होती. या देशांच्या व्यतिरिक्त अन्य देशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात नव्हती. तसेच परदेशातून येणारे प्रवाशींच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला.
महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले रुग्ण अमेरिका, थायलंड, दुबई, फ्रान्स या देशांमधून आले असल्याचे आढळून आले आहे. नेमक्या याच देशातून येणाऱ्या प्रवाशांची कठोर तपासणी करण्यात येत नव्हती. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात कोरोनाची लागण झालेले रुग्ण केंद्र सरकारच्या यादीत नसलेल्या देशांमधून आले असल्याची माहिती दिली होती. तसेच यापुढे हे चार देश देखील केंद्र सरकारच्या तपासणीच्या यादीत टाकण्याची सूचना उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबईत 64 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या 64 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळाली आहे. हिंदुजामधील या रुग्णाला कोरोनाची लागण झाल्यानंतर कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते, या रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह यांसारख्या अन्य समस्याही होत्या. देशातील कोरोनाबाधित रुग्णाचा हा तिसरा बळी आहे. तसेच महाराष्ट्रातील कोरोनाची लागण होऊन दगावलेला हा पहिला रुग्ण आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या या रुग्णाने आपल्या प्रवासाची माहिती उघड केली नव्हती आणि त्याने स्वतःला वेगळंसुद्धा ठेवलेलं नव्हतं असं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, राज्यातल्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आज दोननं वाढ झालीय. पिंपरी चिंचवड आणि मुंबईत आज कोरोनाचा प्रत्येकी एक नवा रुग्ण आढळून आला. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा ४१ वर जाऊन पोहोचलाय. देशातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १३० पेक्षा जास्त आहे.