राजगुरुनगर : राजगुरुनगरला पुणे-नाशिक महामार्गावर रविवारी दिवसभर झालेल्या वाहतूककोंडीने प्रवासी आणि नागरिक हैराण झाले. आजच्या वाहतूककोंडीमुळे सुटीच्या आणि लग्नतिथीच्या दिवशी होणाऱ्या वाहतूककोंडीचा अध्याय चालूच ठेवला. सुट्या, यात्रा, लग्नतिथी असल्या, की येथे कायम वाहतूककोंडी होते, हे माहीत असूनही प्रशासनाकडूनकाहीही उपाययोजना होत नाही. नेहमीचे वाहतूक पोलीस रस्त्यांवर लावले जातात आणि ऊन-थंडी-पाऊस असला तरी ते वाहतूक नियोजन करीत राहतात. आठवड्यातून निम्मे दिवस काही ना काही कारणाने वाहतूककोंडी होते, हे माहीत असूनही उपाययोजना केल्या जात नाहीत. या भागातून जाणाऱ्या महामार्गाच्या कडेने असंख्य वाहने बेशिस्तपणे उभी केलेली असतात. टपऱ्या, हातगाड्या, अतिक्रमणे यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असूनही त्याबाबत काहीही उपाययोजना प्रशासनाकडून केली जात नाही. पाबळ चौकात आणि एसटी स्थानकजवळ वाहने येताना-जाताना नियोजन करण्याची मागणी वेळोवेळी करूनही संबंधित व्यवस्थापन उपाययोजना करीत नाही. या दोन्ही ठिकाणी अनेक वाहने बेशिस्तपणे थांबतात आणि वाहतूककोंडी वाढवितात, पण त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. फक्त आला दिवस रेटत राहायचा एवढाच मार्ग वाहतूककोंडीबाबत अनुसरला जात आहे. आज तर सकाळपासूनच वाहतूककोंडीला सुरुवात झाली. दुपारी रांगा टोलनाक्यापर्यंत गेल्या होत्या. या भागात असलेली मंगल कार्यालयांमध्ये समारंभ असले, की तेथून वाहतूककोंडीस सुरुवात होते. कार्यक्रम झाला की एकदम वाहने राजगुरुनागरच्या बाजूला यायला निघतात आणि वाहतूककोंडी होते. दुपारी कंपन्यांच्या गाड्या यायला सुरुवात झाली, की वाहतुकीचा ताण वाढतो. सुटीत आणि उत्सव, जत्रा, लग्नाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाहने रस्त्यावर येतात. या मार्गात असलेले दोन अरुंद पूल वाहतूककोंडी वाढवितात. या सर्व गोष्टी माहीत असतानाही त्याबाबत उपाययोजना होत नाहीत. अनेक उपाययोजना आहेत. पण महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, पोलीस, महसूल आणि नगर परिषद प्रशासनाने एकत्र येऊन व्यवस्था ठरविणे आवश्यक असताना त्याबाबत कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे सामान्य वाहनचालक, प्रवासी, नागरिक त्रस्त होतात आणि नेहमीच्या वाहतूककोंडीला सामोरे जातात. (वार्ताहर)शरद पवार तासभर अडकलेपुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीचा फटका राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही बसला. त्यांचे वाहन सायंकाळी पाच ते सहाचे दरम्यान चक्क तासभर वाहतूक कोंडीत अडकले होते. महामार्गावर चाकण आणि राजगुरुनगर येथे हमखास गर्दी असते. त्यामुळे शरद पवार यांनाही त्याचा अनुभव घ्यावा लागला. नाशिक बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना त्यांचे वाहन राजगुरुनगर (ता.खेड) येथे बस स्थानकालगतच्या भागात वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. मात्र लांबपर्यंत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे वाहतूक पोलीस आणि तेही हतबल झाले. खुद्द शरद पवार यांनीच प्रत्यक्षात वाहतूक कोंडीचा अनुभव घेतल्यानंतर आता तरी या रस्त्याच्या कामाकडे शासनाचे लक्ष जाणार का ? याकडे सामन्यांचे लक्ष लागले आहे. या उपाययोजना कधी होणार? पोलीस ठाण्याजवळून गावात जाणाऱ्या रस्त्याची आणि त्यापुढील मार्गाची सुधारणा केल्यास काही वाहतूक कमी होऊ शकते.चासकमान कालव्याजवळचा रास्ता काँक्रिटीकरणाने मजबूत आणि रुंद केल्यास तेथूनही काही वाहतूक वळविता येऊ शकते. एसटी स्थानकातून वळणाऱ्या गाड्यांचे नियोजन केल्यास काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. जुना मोटार स्टॅन्ड परिसरात गोलाकार एकेरी वाहतूक ठेवल्यास त्रास कमी होऊ शकतो. महामार्ग ते पाबळ रस्त्यावर सिद्धेश्वरजवळून जाणारा रस्ता रुंद आणि काँक्रीटचा केल्यास काही वाहतूक वळविता येऊ शकते. अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक ठिकाणी जागा दिल्यास अडचण कमी होऊ शकते.
राजगुरुनगरला दिवसभर वाहतूककोंडी
By admin | Published: December 26, 2016 2:50 AM