लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बुडणाऱ्या माणसाला वाचवायचे असेल तर किनाºयावरून फिरून भागत नाही. त्यासाठी पाण्यात उतरावे लागते. आज देशात शेतकरी आत्महत्या करीत आहे, तरुण बेरोजगार आहेत. हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी देशात राहणे गरजेचे आहे. विदेशात फिरून आणि सुट बदलून देश बदलणार नाही, अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर रविवारी केली.एआयएसएफचा संविधान बचाव लाँगमार्च रविवारी बीडमध्ये पोहोचला. यानिमित्त आयोजित रोहित अॅक्ट परिषदेत कन्हैया कुमार बोलत होता. तो म्हणाला, आज देशाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. गांधीजींचे नातू हरतात आणि गोडसेंचे वारस जिंकतात, अशी परिस्थिती आहे.शेतकरी आत्महत्या, महिला अत्याचार या विषयावर आम्हाला आवाज उठवावा लागेल. शिक्षण, रोजगार, आरोग्य या विषयावर बोलावे लागेल. आत्मसन्मानासाठी झगडावे लागेल.मोदी देशाचे निवडून आलेले पंतप्रधान आहेत. म्हणून आम्ही सांसदीय मार्गाने प्रश्न विचारत आहोत. त्यांनी हिटलरची चाल चलू नये. मोदी अपराजित आहेत असे त्यांना वाटते. त्यांनी भ्रमात राहू नये. जर ‘एक देश एक टॅक्स’ हे धोरण असेल, तर ‘एक देश एक न्याय, एक देश एक शिक्षण व्यवस्था’ ही परिस्थिती का राहत नाही, असा सवालही त्याने केला.देशात वर्षाला १२ हजार शेतकरी आत्महत्या होतात आणि पीकविमा घेणाºया कंपनीला वर्षाला १० हजार कोटींचा नफा होतो; गंगा नदीच्या सफाईवर ६० हजार कोटी खर्च होतात. तितका पैसा शेतकऱ्यांना दिला तर आत्महत्या होणार नाहीत, असे सांगून तो म्हणाला, देश वाचवायचा असेल तर या विरोधात आवाज उठवावा लागेल. नुसत्या सभा घेऊन किंवा भाषणे करून हे होणार नाही तर यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरावे लागेल, असे आवाहन कन्हैय्याकुमार याने कले.
‘विदेशात फिरून देश बदलत नाही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 4:59 AM