विजय मोरे, नाशिक‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यांतर्गत प्रवाशांच्या प्रदीर्घ सेवेनंतर या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकत आंतरराष्ट्रीय एसटीसेवेची मुहूर्तमेढ केवळ रोवलीच नाही, तर सुरूदेखील केली आहे़ एसटीच्या या सेवेद्वारे प्रवाशांना नाशिकहून बांगलादेशचा प्रवास केवळ ६४ रुपयांमध्ये करणे शक्य झाले आहे़ विशेष म्हणजे, इतक्या दूरच्या या प्रवासाचे एकूण टप्पे केवळ दहा असणार आहेत़
एसटी महामंडळाने नव्याने सुरू केलेल्या या सेवेबाबत अनभिज्ञ असलेल्या प्रवाशांना या आंतरराष्ट्रीय प्रवाससेवेबाबत प्रश्नचिन्ह पडणे साहजिकच आहे़ कारण एसटीच्या प्रवाशांना पावसाळ्यात गळणाºया बसेस, खिडक्या एकदा बंद केल्या की उघडणे आणि उघडलेल्या असतील तर बंद करणे अवघड, रस्त्यावरून जाताना होणारा खडखड आवाज याची जणू सवयच झाली आहे़ त्यातच कामगारांचे वेतन करारासाठी आंदोलन सुरू असताना ही सेवा नेमकी कोणी, केव्हा व कधी सुरू केली? विशेष म्हणजे एसटी कात टाकतेय, मनोरंजनासाठी वायफाय सुरू केले आहे याची धूमधडाक्यात प्रसिद्धी करणाºया महामंडळांने या आंतरराष्ट्रीय सेवेचा गाजावाजा का केला नाही, अशी शंका प्रवाशांच्या मनात उपस्थित होणे साहजिकच आहे़एसटी महामंडळाच्या या आंतरराष्ट्रीय सेवेबाबत सविस्तर चर्चेचे कारण असे की, महामंडळाच्या जालना जिल्ह्यातील अंबड आगाराच्या साध्या एसटीमध्ये २२ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी येवल्याहून एक प्रवासी बसला़ या प्रवाशाचा तिकीट क्रमांक होता ०१००९९़ बसचे कंडक्टर डी़ डी़ गरड यांनी या प्रवाशास दिलेले तिकीट सध्या सोशल मीडियावरील व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले आहे़ या तिकिटावर येवला ते बांगलादेश असे लिहिलेले असून, प्रवासाचे दहा टप्पे आहेत़ मुळात प्रवास भाडे हे केवळ ६३ रुपये असून, अपघात संरक्षण निधीचा एक रुपया त्यामध्ये अधिक झाल्याने हे प्रवासभाडे ६४ रुपये झाले आहे़एसटी महामंडळाचे कर्मचारी हे पुरेशा सुविधांअभावी दिवस-रात्र प्रवाशांना सेवा देत आहेत़ मात्र, सोशल मीडिया व्हॉट्सअॅपवर व्हायरल झालेल्या या तिकिटामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. अर्थात, हे मूळ तिकीट आहे की यात कोणी खोडसाळपणा करून फेरबदल केलाय हा संशोधनाचा विषय आहे़