- यदु जोशीमुंबई - ढाब्यावर जेवण्याचे प्रकरण मध्यंतरी राज्य भाजपमध्ये गाजले. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सात - आठ राज्यांमधील जे नेते तब्बल दोन - अडीच महिने महाराष्ट्रात राहणार आहेत, त्यांना ढाब्यावर, बड्या हॉटेलांमध्ये जेवण्यास मनाई करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांकडेच जेवण, नाष्टा करा आणि चहाही तिथेच प्या, असे त्यांना सांगितले.
राज्याच्या विविध भागांमध्ये परराज्यातील बडे नेेते, मंत्री, खासदार यांना विधानसभेची निवडणूक संपेपर्यंत मुक्कामी राहण्यास सांगण्यात आले. या प्रवासी नेत्यांची आणि विदर्भातील भाजप पदाधिकाऱ्यांची आठ तासांची बैठक ३१ ऑगस्टला नागपुरात झाली. त्यात ढाब्यावरील जेवणासह विविध सूचना देण्यात आल्या.
गुप्तता पाळली जात आहे- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे निकटवर्ती मानले जाणारे गुजरातचे आरोग्य मंत्री ऋषिकेश पटेल हे चार दिवसांपासून अमरावती शहरामध्ये मुक्कामी आहेत. - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सामान्य कार्यकर्ते, सामान्य माणसांना गावोगावी जाऊन ते त्यांच्या भावना जाणून घेत वर रिपोर्टिंग करत असल्याची माहिती आहे, असे बरेच नेते प्रसिद्धी माध्यमांना माहिती होऊ न देता गुप्त मोहिमेवर राज्यात फिरत आहेत.
बड्या नेत्यांना एकेक विभाग दिला वाटून - नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात निवडणूक होईल, असा अंदाज आहे. एक - दोन राज्यांच्या बड्या नेत्यांना एकेक विभाग (जसे विदर्भ, मराठवाडा) वाटून देण्यात आले.- याशिवाय एकेका नेत्याला जिल्हा, विधानसभानिहायदेखील जबाबदारी देण्यात आली आहे. १९८० पासून भाजपचे किंवा त्याही आधी जनसंघाचे कोण कोण नेते आहेत, त्यांना भेटा, विश्वासात घ्या आणि सक्रिय करा, असे त्यांना सांगण्यात आले आहे.
२२ कलमी कार्यक्रमहे जे प्रवासी नेते आहेत, त्यांनी काय काय करायचे, याची २२ कलमे असणारी यादीच त्यांनी दिली आहे.पक्ष कार्यालय, कार्यकर्ते सक्रिय करा, बूथ पातळीपासून कार्यकर्त्यांच्या बैठका घ्या, पक्षामध्ये अंतर्गत मतभेद असतील तर ते मिटवा, पक्षाच्या विविध आघाड्यांना सक्रिय करा, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थींशी संपर्क करण्याची यंत्रणा उभारा आदी कार्यक्रम त्यांना देण्यात आले आहेत.