लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मित्राच्या पासपोर्टवर सौदी अरेबियातून भारतापर्यंत प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिक असलेल्या बँकरला सहार पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. कामानिमित्त अकरा वर्षांपूर्वी तो विदेशात गेला होता.सचिन सिंग असे अटक करण्यात आलेल्या बँकरचे नाव आहे. जो मूळचा भारतीय असून मुंबईचा राहणारा आहे. सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००६ साली तो कामानिमित्त सौदी अरेबियाला गेला. तेथे तो एका नामांकित बँकेत काम करत होता. मात्र त्या ठिकाणी त्याचा पासपोर्ट त्याच्या कार्यालयाने स्वत:कडे ठेवला होता. मात्र सिंगला भारतात परत यायचे होते. त्यामुळे त्याने त्याच्या एका मित्राचा पासपोर्ट घेतला आणि त्याच्या मदतीने तो भारतात आला, असे त्याने पोलिसांना सांगितले आहे. भारतीय विमानतळावर जेव्हा संबंधित सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्याचा पासपोर्ट तपासला, तेव्हा तो त्याचा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी सिंगला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र सौदीपासून भारतात परतेपर्यंत त्याच्यावर कोणालाच संशय का आला नाही, असा प्रश्न सहार पोलिसांना पडला आहे. या प्रकरणी सिंगला अटक करत अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच त्याने यापूर्वीदेखील असा काही प्रकार केलाय का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
मित्राच्या पासपोर्टवर सौदीतून भारतापर्यंत प्रवास
By admin | Published: May 24, 2017 3:14 AM