मुंबई : समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याची कामे पूर्ण झाली असून आता या रस्त्याच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) वेळ मागितली आहे. त्यामुळे मेच्या सुरुवातीला हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागपूर ते मुंबई थेट प्रवास करता येईल.
समृद्धीचा शेवटचा टप्पा खुला झाल्यानंतर नागपूरहून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर पोहोचणे शक्य होईल. तसेच हा संपूर्ण ७०१ कि.मी.चा महामार्ग सेवेत दाखल होईल.
विधानसभा निवडणुकीपूर्वी याचा इगतपुरी ते आमने हा शेवटच्या टप्प्यातील मार्ग खुला केला जाणार होता. मात्र या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या खर्डी येथील पुलाचे काम बाकी होते.
तसेच समृद्धीचा शेवट होतो, त्या आमने येथून पुढे वडपेला जाण्यासाठीच्या रस्त्याचे काम अपूर्ण होते. त्यावेळी फेब्रुवारीपर्यंत हा रस्ता सुरू करण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले होते. मात्र वडपे येथे नाशिक रस्त्याला जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कनेक्टरचे काम अपूर्ण असल्याने या मुदतीत हा महामार्ग सुरू होऊ शकला नव्हता.
मुंबई ते आमने प्रवास तूर्त अडथळ्यांचा
सध्या ठाणे-वडपे रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक संथगतीने चालते. समृद्धी महामार्ग सुरू झाला तरी या रस्त्याचे काम पूर्ण होण्यास आणखी काही महिने लागणार आहेत. त्यामुळे मुंबई ते आमने हा प्रवास तूर्त तरी अडथळ्यांचा राहणार आहे.
उद्घाटनासाठी मागितली वेळ
या महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी राज्य सरकारकडे वेळ मागण्यात आली आहे, अशी माहिती एमएसआरडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
सद्य:स्थितीत वडपे येथे नाशिक हायवेला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या कनेक्टरच्या एका पुलाचे काम अपूर्ण आहे. ते पूर्ण होण्यास दोन महिने लागतील. तोपर्यंत या भागात वाहतूक अन्य मार्गांनी वळण घेऊन वळविली जाणार आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
इगतपुरी ते आमने टप्पा लवकरच पूर्ण होणार
समृद्धीचा नागपूर ते शिर्डी हा ५२० कि.मी.चा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये खुला केला होता. दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर असा जवळपास ८० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.
तर गेल्या वर्षी तिसऱ्या टप्प्यात एमएसआरडीसीने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २३ कि.मी.चा मार्ग सुरू केला होता. आता शेवटच्या टप्प्यात ७६ कि.मी.चा इगतपुरी ते आमने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.