अकोला: विकासाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेल्या विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी शासनाचा खजिना उघडला गेला पाहिजे. या भागाच्या विकासासाठी मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत मागून घ्या असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी अकोल्यात लोकप्रतिनिधींना केले.जिल्हा प्रशासनामार्फत अकोला क्रिकेट क्लब मैदानावर आयोजित विविध शासकीय इमारतींचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला खासदार संजय धोत्रे, आ. भाऊसाहेब फुंडकर, आ. गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिसन बाजोरिया, आ. हरीश पिंपळे, आ. बळीराम सिरस्कार, आ. प्रकाश भारसाकळे, आ. रणधीर सावरकर व आ. आकाश फुंडकर प्रामुख्याने उपस्थित होते.दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्यांच्या मदतीसाठी सरकारने १८ हजार कोटी रुपये दिले. परंतु या मदतीने शेतकर्यांचे भले होणार नाही. शाश्वत शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.जलयुक्त शिवार दुष्काळावर रामबाण! वारंवार निर्माण होणार्या दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान हा रामबाण उपाय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरविल्यास शेतीला शाश्वत सिंचनाची सुविधा उपलब्ध होऊ शकते. राज्यात लोकसहभागातून राबविण्यात येत असलेले जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ झाली असून, देशाच्या विविध भागात हे अभियान राबविण्याचे धोरण केंद्र सरकारने ठरविल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासाठी खजिना खुला !
By admin | Published: February 12, 2016 2:19 AM