मुंबई : नागपूर शहरातील मेयो व मेडिकल या दोन शासकीय रुग्णालयांसह प्रादेशिक मनोरुग्णालयात मायग्रेन या आजाराचे रोगनिदान व उपचार उपलब्ध आहेत. कामगारांमध्येही या आजाराचे वाढते प्रमाण पाहता तेथील कामगार विमा रुग्णालयात मायग्रेन उपचार केंद्र सुरू केले जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत केली.डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी सूचना मांडत नागपूर शहरात मेंदूशी संबंधित असलेल्या ‘मायग्रेन’ डोके दुखणे या आजारामुळे ४ लाख रुग्ण बाधित झाल्याकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. डॉ. माने म्हणाले, हा आजार १५ ते ३० वयोगटातील तरुणींमध्ये जास्त प्रमाणात आढळून आला आहे. या आजाराने ५ टक्के पुरुष व २० टक्के तरुणी व्याधीग्रस्त असल्याची माहिती समोर आल्याचे त्यांनी सांगितले. सुधाकर देशमुख यांनी नागपुरातील कामगारांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढल्याचे सांगत तेथील कामगार विमा रुग्णालयात उपचार केंद्र सुरू करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)
नागपूरातील रुग्णालयात माायग्रेन उपचार
By admin | Published: March 16, 2016 8:36 AM