पुणे : महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवरील सदस्यांची निवड १५ एप्रिलपूर्वी करण्यात येईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. शिक्षण मंडळाची मुदत जुलै २०१७पर्यंत असल्यामुळे तोपर्यंत काही करता येणार नाही. स्वीकृत सदस्य निवड, पुणे मेट्रो कंपनी व अन्य काही ठिकाणांच्या नियुक्त्या सरकारकडून मार्गदर्शन येईल त्याप्रमाणे मुदतीच्या आत करण्यात येतील, असे महापौरांनी स्पष्ट केले.समित्यांवरील नियुक्त्या तसेच स्वीकृत सदस्यांची निवड, यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पार्टीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. संघटनात्मक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यावर वर्णी लावावी, यासाठी नेत्यांकडे लकडा लावला आहे. त्यामुळे पक्षाच्या नेत्यांची अडचण झाली आहे. त्यातूनच स्वीकृत सदस्यांची निवड लांबणीवर टाकण्यात आली आहे. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्याप्रमाणे या पदावरील नियुक्ती करण्यात येईल, असे महापौर म्हणाल्या. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनीही या पदावरील निवड १५ एप्रिलनंतरच होईल, असे स्पष्ट केले.दरम्यान, वृक्ष प्राधिकरण समिती मात्र लवकरच अस्तित्वात येईल. सरकारच्या नियमाप्रमाणे नवे सभागृह अस्तित्वात येताच जुनी समिती विसर्जित झाली आहे. नव्या समितीवर पूर्वीप्रमाणे १३ नगरसेवक व १३ अशासकीय सदस्य, अशा २६ सदस्यांची नियुक्ती आता करता येणार नाही. सरकारने त्यासाठी कमीत कमी ५ व जास्तीत जास्त १५ अशी मर्यादा घातली आहे. राजकीय पक्षांच्या सदस्यसंख्येनुसार या समितीवर भाजपाकडून सदस्यनिवड होईल, असे दिसते आहे. (प्रतिनिधी)सदस्यांची निवड १५ एप्रिलपूर्वी करण्यात येणार.महापालिकेतील सत्ताधारी भाजपात सदस्य निवडीवरुन चुरस निर्माण झाली आहे. पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानुसार नियुक्ती होणार असल्याचे महापौरांकडून स्पष्टीकरण.
वृक्ष प्राधिकरण समिती लवकरच
By admin | Published: April 06, 2017 12:42 AM