लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : पावसाळ्यात उड्या मारणारा बेडूक आतापर्यंत आपण पाहिला असेल. मात्र, भिंतीवर चिकटून राहणारा बेडूक तसा कधी ऐकिवात नाही. पण, असा भिंतीवर तसेच एखाद्या उंचीवरील मऊ भागावर चिकटून राहणारा बेडूक सोलापुरात आढळला. ट्री फ्रॉग असे या बेडकाला संबोधले जाते. नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सदस्यांनी (एनसीसीएस) त्या बेडकास श्री सिद्धेश्वर वन विहारात सोडून दिले.
जुळे सोलापूर येथे खरेदीसाठी व्यक्ती पिशवी घेऊन आली होती. खरेदीसाठी पिशवी उघडली असता त्यातून बेडूक बाहेर आला. हा बेडूक सामान्य बेडकापेक्षा वेगळा दिसत असल्याने नागरिकांनी एनसीसीएस सदस्यांना माहिती दिली. बेडकाची पाहणी केल्यानंतर हा बेडूक ट्री -फ्रॉग असल्याचे कळाले.
हा बेडूक सोलापुरात कमी प्रमाणात आढळून येतो. या बेडकाच्या पुढच्या पायाची बोटे ही मोठी असतात. त्याच्या वैशिष्टपूर्ण फुग्यासारख्या बोटामुळे व्हॅक्यूम (हवेचा दाब) पद्धतीने तो भिंत तसेच सपाट भाग किंवा झाडावर पालीसारखा चिकटून राहू शकतो.
काय आहेत ट्री फ्रॉगची वैशिष्ट्ये ?ट्री फ्रॉग हा बेडूक झाडावर राहून तेथील किड्यांना खातो. त्याची लांबी ही अडीच ते तीन इंचापर्यंत असते. तो भिंतीवर १० ते १२ फूटपर्यंत देखील चढू शकतो. तसेच पाच ते सहा फुटांपर्यंत उडी मारु शकतो. हा बेडूक मुख्यत: पावसाळयात पाणी असलेल्या जागेत आढळून येतो.