औरंगाबाद - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ४० लाखांहून अधिक मतं घेतली आहेत. पहिल्याच निवडणुकीत पक्षाने शानदार कामगिरी केली असून आगामी विधानसभा निवडणुकीत 'वंचित' अधिक सरस कामगिरी करणार असा विश्वास, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांनी व्यक्त केला. तसेच पक्षाकडे महिलांचा कल वाढत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमचा पक्ष नवखा होता. त्यातच पक्षाला उशिरा मान्यता मिळाल्यामुळे लोकसभेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याचे आंबेडकर म्हणाल्या. महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी शनिवारी औरंगाबादेत इच्छूकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यावेळी त्या उपस्थित होत्या.
अंजली आंबेडकर म्हणाल्या की, 'वंचित'च्या वाटचालीत महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. लोकसभा निवडणुकीत महिलांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता पक्षाचे काम केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील महिलांची नियुक्ती करण्यासाठी मुलाखती घेण्यात येत आहे. परंतु, मुलाखतीसाठी आलेल्या महिलांचा प्रतिसाद भारावून टाकणार आहे. तसेच 'वंचित'कडे सुशिक्षीत महिलांचा कल वाढत असून वकील, एमबीए, निवृत्त शिक्षिका वंचितमध्ये येण्यास इच्छूक असल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.
दरम्यान महिलांना राजकारणात स्थान मिळवून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा 'वंचित'चा मुख्य हेतू आहे. त्यामुळे पद देताना महिलांचे शिक्षण पाहिले जाणार नाही. अनेकदा महिलांना सामाजिक स्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही. परंतु, त्यांना राजकारणाची जाण असते. अशा महिलांना पक्षात स्थान देणार असल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.