अकोला: वर्हाडातील आदिवासी भागातील शेतकरी पांरपरिक पिकांसोबतच नवे प्रयोग राबवित असून, आता या शेतकर्यांनी रेशीम शेती, उद्योगाची कास धरली आहे. रेशीम उद्योगाची शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी या शेतकर्यांना प्रादेशिक रेशीम कार्यालयातर्फे प्रशिक्षण देण्यात येत आहे. ह्यरेशीम शेतीह्ण अलीकडे प्रचंड लोकप्रिय झाली असून, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारा हा प्रमुख जोडधंदा म्हणून, वर्हाडातील शेतकर्यांनी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला वर्हाडात चांगल्यापैकी जम बसविणार्या या रेशीम शेतीला मध्यंतरी अवकळा आली होती; परंतु पुन्हा रेशीम तयार करणार्या तुती लागवडीकडे येथील शेतकरी वळला असून, आदिवासी भागात या पिकाची लागवड करण्यात आली आहे. रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्वतंत्र रेशीम संचालनालय सुरू केले असून, रेशीम शेती करण्यासाठी शेतकर्यांनी पुढे यावे म्हणून अनुदान दिले जात आहे. तुती लागवड व इतर साहित्य खरेदीसाठी शासनाकडून जवळपास २0 हजारांच्यावर अनुदान शेतकर्यांना उपलब्ध करू न दिले जात असून, कीटक संगोपन व गृह बांधणीसाठी दोन लाख इतका खर्च अपेक्षित असल्याने त्याच्या ५0 टक्के म्हणजे एक लाख रक्कम अनुदान दिली जाते.आदिवासी भागातील शेतकर्यांनी रेशीम शेती करावी, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याकरिता अमरावती प्रादेशिक रेशीम कार्यालयात अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा जिल्हय़ातील प्रत्येकी पाच शेतकर्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. पाचरण या आदिवासी भागातील शेतकरी राजाराम डाखोरे यांनी आदिवासी गावातील २५ शेतकर्यांना रेशीम उद्योग करण्यास प्रवृत्त केले असून, रेशीम शेती उद्योगास सुरुवात करण्यात आली आहे. अकोला जिल्हय़ातील अंबाशी येथील शेतकरी सुखदेव लाहोळे यांनी दोन एकर क्षेत्रात एका वर्षात दोन लाख आणि रेशीमला लागणार्या तुतीच्या रोपापासून दोन असे चार लाख रुपये उत्पन्न मिळविले आहे. आदिवासी भागातील शेतकरी रेशीम शेतीसह रेशीम उद्योगाकडे वळत असून, रेशीम उद्योगाचे प्रशिक्षण घेणारे शेतकरीही आदिवासी गावातील शेतकर्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे विभागात रेशीम शेतीचे क्षेत्र वाढत असल्याचे रेशीम विकास अधिकारी सु.प्र. फडके यांनी सांगीतले.
व-हाडातील आदिवासी भागात फुलले रेशीम!
By admin | Published: December 14, 2014 11:52 PM