मुंबई : राज्यातील ११०० आश्रमशाळांमधील पाच लाख आदिवासी विद्यार्थ्यांसाठी लागणारे अन्नधान्य, वह्या, पुस्तके, युनिफॉर्म, भाज्या, अंथरुण-पांघरुण, अन्य शैक्षणिक साहित्य यासाठी खर्चापोटी संबंधित संस्थांना शैक्षणिक वर्ष सुरु होऊन अडीच महिने उलटले तरी अनुदान पोहोचले नसल्याचा दावा शिक्षक भारतीने केला आहे.लोकभारतीचे अध्यक्ष शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे व अन्य सहकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळांना भेट दिली असता ही बाब उघड झाली. आश्रमशाळांना खर्चापोटी ३० टक्के रक्कम अॅडव्हान्स म्हणून वर्षाच्या सुरुवातीला दिली जाते. मात्र अजून पैसे दिले नसल्याकडे मुरबाडचे माजी आमदार दिगंबर विशे यांनी निदर्शनास आणले. विशे मुरबाडच्या तळवली पाड्यावर व्हर्च्युअल क्लास आणि डिजिटल अशा अत्याधुनिक सुविधांनी सज्ज आश्रमशाळा चालवतात. सातशे विद्यार्थ्यांची तोंडमिळवणी करताना संस्थेची दमछाक होते, असे त्यांनी सांगितले. गेल्या अडीच महिन्यात अनुदानाची रक्कम न देणे हे शासनाचे वागणे घटनात्मक जबाबदारी टाळणारे आहे, असे पत्र पाटील यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांना लिहिले आहे. (विशेष प्रतिनिधी)
आदिवासी आश्रमशाळांना अडीच महिने निधी नाही
By admin | Published: August 24, 2015 12:52 AM