शहापूर/अघई : तानसा अभयारण्य परिसरातील बलवंत नाल्याजवळील मुंबईला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली नसून, तिच्या प्रवाह नियंत्रण व्यवस्थेच्या ठिकाणी जे एक छोटे झाकण आहे, ते जंगलात राहणाऱ्या आदिवासींनी पिण्याच्या पाण्याकरिता फोडले आहे. त्यामुळे तिथे पाण्याचा फवारा उडत आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन पाण्याची नासाडी थांबविण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाचे सहायक नियंत्रक पर्यवेक्षक एस. एल. साबळे यांनी सांगितले.जलवाहिनी ज्या परिसरातून जाते, तो पट्टा जंगलाचा आहे. जंगल परिसरात अनेक ठिकाणी आदिवासी पाडे आहेत. साहजिकच, त्यांना पिण्याच्या पाण्याची गरज भासते. सध्या नदीनाल्यांमधील पाणी आटले असून, विहिरींतील पाण्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे आदिवासींना घोटभर पाण्याकरिता जंगल तुडवावे लागते. एखादा पाण्याचा स्रोत दिसला की, त्याचा उपयोग ते पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी करतात. अशाप्रकारे वारंवार वापर होत राहिल्यास प्रवाह नियंत्रण व्यवस्थेतील व्हॉल्व्ह सैल होऊ शकतात.मुंबई महानगरपालिका परिसरातील ग्रामपंचायतींना नळाचे कनेक्शन देते, परंतु संबंधित ग्रामपंचायत जंगलात राहत असलेल्या आदिवासी बांधवांच्या घरांपर्यंत नळ कनेक्शन देऊ शकत नाही. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडतात, असे मुंबई महानगरपालिकेचे सहायक अभियंता पी. बी. चित्रवंशी यांनी सांगितले.
आदिवासींनी फोडले जलवाहिनीचे झाकण
By admin | Published: April 21, 2016 4:48 AM