मुंबई : जात प्रमाणपत्राच्या मुद्यावर आक्रमक पवित्रा घेत दिल्लीला जंतरमंतरवर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी कृती सामाजिक समन्वयक संस्थेने दिला आहे. याच मुद्यावर मसागवर्गीय कृती समितीने सोमवारी आझाद मैदानात मोर्चा काढत राज्य शासनाचा निषेध व्यक्त केला.
आदिवासींच्या प्रलंबित मागण्यांसाठी समन्वय संस्थेने राज्य मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्याम सोनकुसळे यांनी सांगितले. सोनकुसळे म्हणाले की, संसदेच्या अर्थ संकल्पात चलो नवी दिल्लीचा नारा देऊन बेमुदत धरणे आंदोलन केले जाईल. या आंदोलनात महाराष्ट्रासह गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील समाज मंडळांनी पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मागासवर्गीय कृती समितीचे अध्यक्ष संजय हेडाऊ म्हणाले की, राज्यातील जात प्रमाणपत्रांची पडताळणी ही घटनेशी लबाडी आहे. त्याचे मूळ कारण २०००चा जात-प्रमाणपत्रांचा कायदा २००३ चे नियम आणि २०१२ चे नियम पद्द करण्यात यावेत. या एकाच मागणीसाठी समितीने मोर्चा काढण्यात आला आहे. ज्यांच्याकडून काही चुका झाल्या आहेत, त्या दुरूस्त कराव्यात. तर ज्यांनी गुन्हा केला आहे, त्यांच्यावर कार्यवाही करावी. मात्र ज्यांनी काहीही केलेले नाही, त्यांची जात प्रमाणपत्रांच्या पडताळणीआडून नुकसान करू नये, अशी मागणीही कृती समितीने केली आहे.