रविंद्र साळवे । लोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा: येथील लक्ष्मीबाई पहाडी या आदीवासीची २९ एकर जमीन आदीवासी नसलेल्या नाशिकच्या गिरीष खुशालचंद्र पोद्दार या बिल्डरने सगळे कायदे धाब्यावर बसवून खरेदी केली आहे व त्यात त्याला येथील उपनिबंधक कार्यालयानेही साथ दिल्याचा घोटाळा घडला आहे. विशेष म्हणजे आदीवासीची जमीन बिगर आदीवासी व्यक्ती खरेदी करू शकत नाही असा कायदा असल्यामुळे त्यातून पळवाट काढण्यासाठी पहाडी यांच्या जमीनीच्या सातबाऱ्यावरील आदीवासी जमीन हा उल्लेखच नष्ट करण्याची करामत या घोटाळेबाजांनी केली आहे. तर निबंधकांनी मात्र आमच्या समोर आलेल्या दस्त ऐवजांच्या आधारे आम्ही हा व्यवहार नोंदविला असे सांगून हात झटकले आहेत. याबाबतची कागदपत्रे लोकमतच्या हाती आहेत. त्यानुसार मोखाडा येथील रहिवासी असलेले लक्ष्मीबाई दगु पहाडी, योगेश दगु पहाडी व मनोज दगु पहाडी, यांच्या नावे असलेलली ४७८ गट क्रमांकातील १०.८५ हेक्टर मध्ये असलेली २९ एकर जमिनीची नाशिक येथील गिरीश खुशालचंद्र पोद्दार व इतर १३ या बिगर आदिवासी बिल्डराने २००९ मध्ये खरेदी केली आहे. परंतु आदिवासीची असलेली जमीन बिगर आदिवासी व्यक्तीने खरेदी केली कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम ३६ अ नुसार आदिवासीची जमीन बिगर आदिवासींना खरेदी करता येत नाही व शासनाच्या परवानगीची असलेली किचकट अटी-शर्तीतली लांबलचक प्रक्रिया पार पाडणे शक्य होत नसल्याने आदिवासीच्या जमिनी बिगर आदिवासीकडून खरेदी केलीच जाऊ शकत नाहीत. यामुळे येथील महसूल विभागाच्या आशिर्वादाने असे बोगस व्यवहार मोठ्या प्रमाणात मोखाडा दुय्यम निबंधक कार्यालयात होतात. हा व्यवहार सुद्धा पूर्णता: बोगस झाला असून महसूल विभागाचे कर्मचारी तलाठी यांना हाताशी धरून उताऱ्यावरील जमीन आदिवासी असल्याचा शिक्काच गायब करून ही खरेदी केली आहे. तसेच आदिवासीकडून कवडीमोल भावाने घेतलेली जमीन पुन्हा पोद्दार यांनी २०१७ मध्ये परभणी येथील एका आमदारांचे पी ए असलेले नानासाहेब येवले यांना करोडो रुपयांना विकली आहे. मोखाडा दुय्यम निबंधक कार्यालयात उघडपणे बोगस जमीन खरेदी विक्र ी व्यवहार होत असतांना कुणालाच थांगपत्ता लागत नाही ही बाब आश्चर्य जनक आहे. >तलाठी, निबंधकांचे काना वर हातयाबाबत अधिक माहितीसाठी मोखाडा सज्जाचे तलाठी गौतम उबाळे यांच्याशी संपर्क साधला असता सदरच्या जमिनीचा विक्र ी व्यवहार २००९ मध्ये झाला आहे परंतु आता त्या जमिनीच्या उताऱ्यावर आदिवासी असल्याचा उल्लेख नाही.तोच रेकॉर्ड आता आमच्याकडे आहे असे त्यांनी सांगितले परंतु त्याच्या सहीनीशी असलेल्या एप्रिल २०१७ च्या उताऱ्यावर इतर अधिकारात आदिवासी खातेदार असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे आणि आता आॅनलाइन उताऱ्यावर इतर अधिकारात कसलाच समावेश नाही.खरेदी विक्र ी व्यवहारासाठी आलेले उतारे हे तलाठयांच्या सही आणि शिक्क्यानीशी असतात आम्ही मिळणाऱ्या मुद्रांक शुल्कालाच महत्व देतो . - सागर निळे, प्रभारी दुय्यम निबंधक अधिकारी मोखाडा
मोखाड्यात आदिवासी जमीनविक्रीचा घोटाळा
By admin | Published: July 11, 2017 3:51 AM