कासा : आदिवासी भागातील विद्यार्थ्यांची व पालकांची प्रवेशासाठी शाळांमध्ये भटकंती, वणवण सुरु आहे. बऱ्याच शाळांची प्रवेश क्षमताच कमी असल्याने तसेच वर्ग खोल्या, तुकड्या मर्यादित असल्याने सर्वांना प्रवेश देणे अडचणीचे झाले आहे. परिणामी काही विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, मोखाडा, जव्हार विक्रमगड आदी तालुक्यात प्रत्येक गाव पाड्यांवर जिल्हा परिषदेच्या इयत्ता ४ थी व सातवी पर्यंतच्या मराठी शाळा आहेत. परंतु, त्यांच्या क्षमतेपेक्षा विद्यार्थी संख्या जास्त असून पास झाल्यावर आजूबाजूच्या परिसरातील माध्यमिक शाळा व आश्रमशाळेत विद्यार्थी प्रवेशासाठी जातात. या शाळांमध्ये आधीच खूप विद्यार्थी असतात. या परिसरात माध्यमिक अनुदानित शाळा व आश्रमशाळा लांब अंतरावर असून त्यांची संख्याही कमी आहे. प्रत्येक पालक व विद्यार्थी त्याच परीसरातील शाळेमध्ये प्रवेश मिळावा असा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाकडे आग्रह असतो. मात्र शासन कित्येक वर्षांपासून नवीन तुकड्यांना मंजूरी देत नाहीत व विनाअनुदानित तत्वावर वर्ग तुकड्या सुरु केल्यास त्यात अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना मान्यता मिळत नाही परिणामी प्रवेश मर्यादित होतो. परिणामी आदिवासी डोंगराळ व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी परवड होते आहे. विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहत असल्याने मुख्याध्यापकांना पालकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. डहाणू तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांमध्ये प्रवेशाची समस्या निर्माण झाली असून डहाणूत जिल्हापरिषदेच्या प्राथमिक व उच्चमाध्यमिक शाळांची संख्या ४७१ आहे. (वार्ताहर)
आदिवासी विद्यार्थ्यांपुढे प्रवेश समस्या
By admin | Published: May 16, 2016 3:36 AM