डोंबिवली : येथील ‘कोकण युवा प्रतिष्ठान’तर्फे रविवारी महाड येथील सावित्री नदी दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुर्घटनेतील अपघातग्रस्तांना जाहीर झालेली मदत त्यांच्या नातेवाइकांना तातडीने मिळावी, मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने मार्गी लावावे तसेच कोकणवासीयांच्या अन्य प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रतिष्ठानचे पदाधिकारी लवकरच सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेणार आहेत.पूर्वेतील स.वा. जोशी विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात महाड दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी कोकणवासी चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी केडीएमसीचे माजी सचिव चंद्रकांत माने, राजेश कदम, संतोष चव्हाण, दीपक भोसले, दीपिका पेडणेकर, सुदेश चुडनाईक, काका तोडणकर, अभिजित थरवळ, नंदू ठोसर, श्रीकांत बिरमोळे, राजेश उत्तेकर, धनंजय चाळके, निखिल माने आदी मान्यवर उपस्थित होते.सावित्री नदी दुर्घटनेतील मृतांना जाहीर झालेली मदत तातडीने त्यांच्या नातेवाइकांना मिळावी, ज्यांचे मृतदेह अद्याप मिळालेले नाही त्यांच्या नातेवाइकांना सरकारी कामकाजाच्या फेऱ्यात न अडकवता त्यांना जाहीर केलेली मदत सहानुभूतिपूर्वक मिळावी, या विनंतीसाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या पत्रात गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेकडेही लक्ष वेधण्यात येणार आहे. तातडीने या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी केली जाणार आहे. शिंदे यांची भेट घेऊन त्यांना हे पत्र दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)
महाड दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली
By admin | Published: August 10, 2016 2:34 AM