पुणे लोकसभा मतदारसंघातील खासदार आणि भाजपा नेते गिरीश बापट यांचं आज दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनामुळे भाजपाच्या पुण्यातील राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. तसेच विविध मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली, अशा शब्दात राज ठाकरे यांनी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहिली.
गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहताना राज ठाकरे म्हणाले की, पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार, माजी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माझे मित्र गिरीश बापट ह्यांचं निधन झालं. राजकीय मतभेद हे व्यक्तिगत मैत्रीच्या आड येऊ द्यायचे नसतात, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती गिरीश बापटांनी कसोशीने पाळली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ओम शांती.
खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले. ते महाराष्ट्रातील भाजपच्या जेष्ठ नेत्यांपैकी एक होते. चार दशकांच्या राजकीय कारकीर्दीत गिरीश बापट यांनी संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अशा विविध पदावर काम केले. पुणे शहरातील राजकारणात बापट यांची चांगली पकड होती. ते शहरातील मध्यवर्ती विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या कसबा मतदारसंघातून सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी ठेवण्यात येईल. संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.