सोमेश्वरनगर (जि. पुणे) : ऊस गाळप हंगाम तोंडावर आला असताना ऊस तोडणी कामगार व वाहतूकदारांचा संप सुरूच आहे. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी ऊस तोडणी कामगार व वाहतूकदार संघटनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली.संघटनेच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करून चार दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले. दोन महिन्यांपासून ऊस तोडणी व वाहतूकदारांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान संपाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले. बुधवारी शरद पवार यांनी मेखळी (ता. बारामती) येथे कामगार संघटनेचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे पाटील, पदाधिकारी आश्रुदास कराड, बबनराव पाले, बाबासाहेब घायतोडक, रामदास पानवळ यांच्याशी अर्धा तास चर्चा केली. पवार यांनी संघटनेच्या मागण्या समजून घेतल्या. ऊस तोडणी व वाहतूकदारांकडून प्राप्तिकराची कपात करू नये. कामगारांना शासनाने पक्की घरे बांधून द्यावीत. त्यांना स्वच्छ पाणी व वीज पुरवठा करावा. मुकादमांना कामगार विभागामार्फत ओळखपत्रे द्यावीत. कामगारांच्या मुलांना शासकीय व निमशासकीय क्षेत्रात नोकरीत आरक्षण द्यावे आदी मागण्यांविषयी शिष्टमंडळातील सदस्यांनी पवार यांच्याशी चर्चा केली. (प्रतिनिधी)
ऊस तोडणी कामगारांच्या संपावर तोडग्यासाठी प्रयत्न
By admin | Published: October 23, 2014 2:45 AM