पुणे : घरामध्ये एकट्या असलेल्या मुलीचे हात व तोंड बांधून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कोंढव्यामध्ये सोमवारी रात्री आठच्या सुमारास घडली. तरुणीने स्वत:ची सुटका करून घेत घरातून पळ काढला. दरम्यान, तिचे आई-वडील आल्याची चाहुल लागताच हे चोरटे पसार झाले. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी १७ वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक परिसरामध्ये फिर्यादी मुलगी आणि तिचा भाऊ, आई, वडील राहतात. बारावीमध्ये शिकत असलेली ही मुलगी सोमवारी सायंकाळी घरात एकटीच होती. तिची आई जवळच्या दवाखान्यात गेली होती. दाराची बेल वाजल्यानंतर तिने दरवाजा उघडला. काही कळायच्या आत दोन अनोळखी व्यक्ती घरात शिरल्या. त्यांनी तिच्याकडे पैशांची मागणी केली. ओढणीने हात व तोंड बांधल्यानंतर एकाने तिला धरून ठेवले. दुसऱ्या व्यक्तीने कपाटाचा धांडोळा घेत कपडे व वस्तू अस्ताव्यस्त करून मौल्यवान वस्तूंचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. मुलीने हिसका देऊन स्वत:ची सुटका करून घेतली. ती धावत छतावरील पाण्याच्या टाकीजवळ लपून बसली. थोड्या वेळाने ओळखीची एक मुलगी तेथे आल्यावर मुलीला भेदरलेल्या अवस्थेत पाहिले. तिचे हात व तोंड बांधलेले होते. या मुलीने तिचे हात सोडल्यावर दोघीही घरी आल्या, त्या वेळी तिचे आई-वडील घरी आलेले होते. मुलीने सर्व प्रकार सांगताच कोंढवा पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली. (प्रतिनिधी)
मुलीचे हात-तोंड बांधून चोरीचा प्रयत्न
By admin | Published: February 09, 2017 3:33 AM