ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. १ - एकापाठोपाठ दोन मुली झाल्याच्या कारणावरुन सासरच्या मंडळीकडून होणा-या त्रासाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने स्वत:च्या ४ आणि २ वर्ष वयाच्या मुलींना विष पाजले आणि स्वत:ही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील महालपिंप्री येथे घडली.
विवाहितेसह तिच्या दोन्ही मुलींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. निता सतिश भोळे (२२) , दिव्या सतीश भोळे(४) आणि दिप्ती सतीश भोळे(२)अशी मायलेकींची नावे आहेत. याविषयी अधिक माहिती देताना पोलिस आणि निताच्या नातेवाईकांनी सांगितले की, सहा वर्षापूर्वी महालपिंप्री येथे राहणा-या सतीशचा विवाह झाला.
निताचे आईवडिल औरंगाबादेतील प्रकाशनगर येथे राहतात. ते मोलमजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. निताला दिव्या आणि दिप्ती या दोन मुली आहेत. लग्नानंतर माहेरून पैसे आणावे, म्हणून तिचा पती तिला सतत शिवीगाळ करीत मारहाण करायचा. तिने दोन मुलींना जन्म दिल्यापासून तर त्यांच्याकडून होणारा त्रास अधिक वाढला.
हा त्रास असह्य झाल्याने नीताने शनिवारी सकाळी आत्महत्येचा निर्णय घेतला. मात्र आपल्या पश्चात आपल्या चिमुकल्यांचे काय होईल, या चिंतेपोटी तिने प्रथम दोन्ही चिमुकलींना विषाचा घोट दिला आणि नंतर स्वत:ही विष प्राशन केले. ही बाब तिच्या पतीसह सासरच्या मंडळींच्या लक्षात येताच त्यांनी दिव्या, दिप्ती आणि नीता यांना एका वाहनातून तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद चिकलठाणा पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे. याविषयी माहिती देताना चिकलठाणा पोलिसांनी सांगितले की, निताचा जबाब अद्याप झालेला नाही. त्यामुळे नेमकी ही घटना कशी घडली,याबाबतचा उलगडा होऊ शकला नाही.