मनीषा म्हात्रे मुंबई : घरातील चौथी मुलगी. शिक्षण सुरू असतानाच चांगल्या घरातून मागणे आल्याने लगीनघाई करत कुटुंबीयांनी तिचा विवाह करून दिला. तीसुद्धा सुखी संसाराची स्वप्ने रंगवत होती. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. विवाहानंतर महिनाभरातच पती आणि सासरच्या मंडळींनी अपशकुनी ठरवले. लग्नाला वर्ष झाले तरी मूल होत नाही म्हणून जादूटोण्याच्या अघोरी प्रथेत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. त्यातूनही काहीच सिद्ध न झाल्याने विवाहितेला ट्रिपल तलाक देत, थेट घराबाहेर काढल्याची धक्कादायक घटना वांद्रे येथील उच्चभ्रू वसाहतीत उघडकीस आली. विशेष म्हणजे पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेण्यासाठी उदासीन पोलिसांनी तब्बल महिना काढला आहे.वर्सोवा परिसरात आई-वडील आणि तीन बहिणींसोबत राहणारी २१ वर्षांची राबीया (नावात बदल) घरात सर्वात लहान. १३ वीचे शिक्षण सुरू असतानाच चांगले स्थळ आले म्हणून कुटुंबीयांनी तिचा विवाह करण्याचे ठरविले. सासरच्या मंडळींनी लग्नानंतर शिक्षण सुरू ठेवण्याला होकार दिला. कुटुंबीयांनी मे २०१६ मध्ये आजिम शेखसोबत थाटामाटात मुलीचे लग्न केले. मात्र लग्नाच्या महिन्याभरानंतरच सासरच्या मंडळींनी तिला त्रास देत शिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिला. आधीच लग्नाचा भार वडिलांवर असताना पुन्हा आपले ओझे नको, त्यात नवीन संसारात वाद नको म्हणून ती शांत राहिली. माहेरच्या मंडळींनी दिलेल्या वस्तू कमी असल्याचे सांगून पतीच्या व्यवसायासाठी ५ लाखांची मागणी करण्यात आली.पैशांचा तगादा, त्यात अपशकुनी असल्यामुळे घरातील वाईट घटनांचा दोष तिच्या माथी सुरू झाला. ऊठबस टोमणे सुरू झाले. त्यात वर्ष झाले तरी मूल होत नाही म्हणून जादूटोण्याचा आधार सासरच्या मंडळींनी घेतला. यामध्ये तिला शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. रोज नवनवीन बाबांच्या हातून मारझोड, तंत्रमंत्राचा पाढा यामुळे ती आणखीनच खचून गेली. जादूटोण्यानेही काहीच न झाल्याने आजिमने तिला तिहेरी तलाक देत घराबाहेर काढले.हुंडाबळी, जादूटोणा कायद्यांतर्गत गुन्हा-या प्रकरणात पती आजिम शेख, सासू फरहज सुलताना शेख, सासरे रफी शेख, मोठी जाऊ अमरिन वसी शेख, दीर वसी शेख, इरफान मौलाना या मंडळींविरुद्ध हुंडाबळी तसेच जादूटोणा कायद्यांतर्गत ११ नोव्हेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंधश्रद्धेतून ‘तिहेरी तलाक’, पत्नीला घराबाहेरही काढले : वांद्रे येथील उच्चभ्रू परिसरातील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 2:59 AM