नाशिक : कुंभमेळ्यासाठी नाशिकला येणार्या साधू-महंत आणि त्यांचे खालसे यांच्यासाठी साधुग्राम विकसित केले जाते. त्र्यंबकेश्वर येथे आखाड्यांच्या स्वमालकीच्या जागा असल्या, तरी तेथेही आता आखाड्यांच्या जागा कमी पडू लागल्याने साधुग्रामची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे गेल्यावेळेप्रमाणे यंदाही साधुग्रामची उभारणी करण्यात येणार आहे आणि मागणीनुसारच जागावाटप करण्यात येणार आहे.कुंभमेळ्यात त्र्यंबकेश्वर येथे शैव आखाडे येतात. या आखाड्यांच्या स्वमालकीच्या जागा असून, साहजिकच तेथे येणार्या साधू-महंतांच्या निवासाची व्यवस्था होत असते. त्यामुळे साधुग्राम विकसित करण्याची गरज भासत नाही; मात्र गेल्या कुंभमेळ्यात प्रथमच साधू-महंतांसाठी साधुग्राम तयार करावे अशी आखाड्यांकडे मागणी झाली. त्यानुसार शासकीय विश्रामगृहालगत साधुग्राम विकसित करण्यात आले होते. यंदा तशी थेट मागणी जिल्हा प्रशासनाकडे आलेली नाही. तथापि, कुंभमेळ्याच्या कालावधीत त्र्यंबकेश्वर येथे पोलिसांच्या तात्पुरत्या बराकी उभारण्यासाठी तसेच अन्य कामांसाठी जिल्हा प्रशासनाने तशी तयारी केली आहे. गेल्यावेळी शासकीय विश्रामगृहालगत ज्या ठिकाणी साधुग्राम विकसित करण्यात आले होते त्याच परिसरात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या पन्नास एकर जागेत साधुग्राम आणि पोलिसांच्या बराकी उभारण्याची तयारी सुरू आहे. कुंभमेळ्यासंदर्भात त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या आराखड्यात सुरुवातीला त्याचा समावेश होता; परंतु आता ही कामे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणार आहेत. लवकरच या जागेची पाहणी करून संयुक्त मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर जागेचे अधिग्रहणाचे सोपस्कार पार पाडले जाणार आहेत.
त्र्यंबकेश्वरलाही साधुग्रामसाठी अधिग्रहण सिंहस्थ कुंभमेळा : मागणीनुसार मिळणार आखाड्यांना जागा
By admin | Published: August 29, 2014 11:32 PM