त्र्यंबकेश्वर : ‘भगवान त्र्यंबकराजा आम्हाला गर्भगृहात येऊन पूजा करण्यासाठी यश दे,’ असे साकडे भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी भगवान त्र्यंबकेश्वराला गर्भगृहाबाहेरून घातले आणि सर्वसामान्यांप्रमाणे त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन मंदिरात अभिषेक केला. दरम्यान, देसाई यांच्या आगमनामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती; मात्र पोलिसांनी शांततेने परिस्थिती हाताळली.पुरुषांप्रमाणेच महिलांनाही गर्भगृहात जाऊन त्र्यंबकेश्वराची पूजा करता यावी, या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शुक्रवारी त्र्यंबकेश्वर येथे अचानक भेट देऊन कुठलीही परंपरा, प्रथा न मोडता पोलीस संरक्षणात त्र्यंबकराजाचे बाहेरून दर्शन घेतले.दर्शन घेऊन बाहेर आल्यावर देसाई यांना स्थानिक महिलांनी मंदिर परिसरातच घेरले. या वेळी देसाई म्हणाल्या, ‘मी प्रत्येक मंदिराच्या प्रथा-परंपरांचा आदर करते. त्याविरुद्ध मी कुठलेही कृत्य करणार नाही. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात महिलांच्या प्रवेशाबाबत मी आव्हान याचिका दाखल केली आहे. जर त्या याचिकेचा निकाल माझ्या बाजूने लागला तर मी सन्मानाने गर्भगृह प्रवेश करेन.’ देसाई माध्यमांशी बोलत असतानाच तेथे गावकरी जमा झाले. पोलिसांनी गावकऱ्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र जनक्षोभ तीव्र होऊन गावकऱ्यांनी पोलिसांचे वाहन अडविण्याचा प्रयत्न केला. स्थानिक महिला तर अधिकच संतप्त झाल्याचे दिसून आले. या वेळी विविध घोषणाही देण्यात येत होत्या. शेवटी पोलिसांनी नागरिकांच्या गर्दीतून पोलीस व्हॅन काढून अक्षरश: सुसाट वेगाने नाशिककडे पळविली आणि त्र्यंबकवासीयांच्या कचाट्यातून तृप्ती देसाई यांची सुटका झाली. (वार्ताहर) ध्वनिक्षेपकावरून माहितीनगरसेविका अनघा फडके यांनी पालिका ध्वनिक्षेपकावरून तृप्ती देसाई त्र्यंबकेश्वरमध्ये येणार असल्याची माहिती दिली. कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होईल यासाठी पोलिसांनी फडके यांच्याशी संपर्क साधून त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत फडके यांनी ही वार्ता त्र्यंबकेश्वरवासीयांपर्यंत पोहोचविली होती.
त्र्यंबकराजा, आम्हाला यश दे !
By admin | Published: March 26, 2016 1:46 AM