ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 21 - माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांच्या मुलाच्या कंपनीवर प्राप्तिकर विभागाने छापे टाकले आहेत. शैलेश पाटील यांच्या एनव्ही ग्रुप या कंपनीच्या विविध शाखांवर प्राप्तिकर विभागाने धाडसत्र सुरू केले आहे. प्राप्तिकर विभागाने कारवाईत जवळपास एक कोटी रुपयांची रोकड जप्त केली असून, शिवराज पाटील-चाकूरकर यांचा मुलगा शैलेश पाटील यांच्यावर बोगस शेअर कॅपिटल गोळा केल्याचा आरोप ठेवला आहे. तसेच परदेशातल्या खोट्या कंपन्यांत पाटील यांनी मनी लाँड्रिंगच्या नावाखाली पैसे गुंतवल्याचंही समोर आलं आहे. एनव्ही ग्रुप या कंपनीवर दिल्लीच्या प्राप्तिकर विभागाने कारवाई केली आहे. शैलेश शिवराज पाटील हे एनव्ही ग्रुपचे डायरेक्टर, इन्व्हेस्टर आहेत. प्राप्तिकर विभागाने केलेल्या कारवाईत एनव्ही ग्रुपच्या पंजाब, दिल्ली, चंदीगडमधील कार्यालयांवर छापे टाकले आहेत. कोण आहेत शिवराज पाटील चाकूरकर ? शिवराज पाटील चाकूरकर हे छोट्या गावात जन्मले आहेत. त्यानंतर त्यांनी अल्पावधीतच राजकारणात नाव कमावलं आहे. लातूरच्या नगराध्यक्षापासून ते केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत त्यांनी मजल मारली आहे. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर चाकूरकर दयानंद विधी महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करीत असे, त्यानंतर लातूरच्या न्यायालयात वकिली व्यवसायाला सुरुवात केली. लातूर नगरपालिकेची त्यांनी निवडणूक लढवली आणि ख-या अर्थानं त्यांची राजकीय कारकीर्द उजळली. नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती अशी पदं भूषवल्यानंतर खासदार, केंद्रीय राज्यमंत्री, केंद्रीय कॅबिनेट मंत्री त्यानंतर लोकसभेचे सभापती, केंद्रीय गृहमंत्री, पंजाबचे राज्यपालपदापर्यंत त्यांची कारकीर्द गाजली.
शिवराज पाटील-चाकूरकरांच्या मुलाच्या कंपनीवर प्राप्तिकर विभागाचं धाडसत्र
By admin | Published: April 21, 2017 6:51 PM