शहाजी फुरडे-पाटील
वाखरी : आषाढी सोहळा जवळ आला की राज्य, परराज्यातील वारकºयांना पांडुरंगाच्या दर्शनाचे वेध लागतात़ त्यासाठी जो-तो आपल्या मार्गाने वारी पोहोच करण्यासाठी पंढरीला निघतो. लाखो वारकरी हे संत महंताच्या पालखी अन् दिंडी सोहळ्याबरोबर येतात़ आषाढी एकादशी सोहळ्यासाठी सुमारे दोन हजारांपेक्षा जास्त स्वतंत्र पालख्या व दिंड्या असून त्यातून आठ ते दहा लाख वारकरी वेगवेगळ्या मार्गाने पंढरपुरात दाखल झाले आहेत; मात्र याची शासनाकडे नोंद नसल्याचे उघडकीस आले आहे.
महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा असून, बहुतेक संतांनी विठ्ठलाला देव मानून त्यांची भक्ती केली़ पंढरीला साक्षात भूवैकुंठ म्हटले आहे. हा लोकदैवत महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, गोवा, तेलंगणा आदी राज्यातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या कित्येक पिढ्यांपासून लाखो लोकांच्या घरात पंढरीच्या वारीची परंपरा आहे. त्यामुळे लाखो वारकरी या सोहळ्यात सहभागी होतात़कित्येक वारकरी हे तपोनिधी संत नारायण महाराज यांनी सुरू केलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई, संत एकनाथ, संत गजानन, संत सोपानकाका या प्रमुख पालख्यांसह संत शनैश्वर, भगवान बाबा, संताजी जगनाडे, चांगावटेश्वर, विठ्ठल-रुक्मिणी कौडण्यपूर, गोंदवलेकर महाराज, भाकरे, बाबाजी चैतन्य बयाजी महाराज, संभाजी महाराज अशा कितीतरी संत महंतांच्या पालख्यांसोबत वारीला येतात.
माऊली व तुकोबांच्या पालख्यांना तर ३०० हून अधिक वर्षांची परंपरा आहे़ अनेक पालख्या या पन्नाशीकडे वाटचाल करीत आहेत. जवळपास नवे जुने संत, महापुरुष, मागील १०० वर्षांतील महाराज, छोटी-मोठी देवस्थाने यांच्याही पालख्या व दिंडी सोहळे सुरू झाले आहेत. नव्याने सुरू होत आहेत.
दोन पालखी सोहळ्यातच ८९१ दिंड्या- संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज या दोन पालखी सोहळ्यात ८९१ दिंड्या आहेत. उर्वरित प्रमुख पालखी सोहळ्यात मिळून ५०० च्या आसपास दिंड्या आहेत. यातील जास्त दिंड्या व पालखी सोहळे हे सातारा, पुणे, अहमदनगर, सोलापूर व मराठवाडा, विदर्भ आणि खान्देशातील आहेत. कोकण भागातील ही काही दिंड्या आहेत. राज्याबाहेरच शेजारच्या कर्नाटक,मध्यप्रदेश या राज्यातूनही शेकडो दिंड्या पंढरीला येतात.
दिंडी अन् वारकºयांची नोंदच मिळेना!- पंढरपूरला येणाºया या छोट्या-मोठ्या दिंड्यांची शासन अथवा पंढरपूर नगरपालिका यापैकी कोणाकडेच कोणता सोहळा, दिंडी कोणत्या मार्गाहून आली़ त्यामध्ये किती वाहने व वारकरी आहेत, याची कसलीही नोंद नाही. - पंढरपूरकडे येणाºया प्रत्येक मार्गावरून पालखी व दिंड्या येतात़ त्यामुळे पंढरीकडे येणारे सर्व रस्ते भक्तीरसाने ओसंडून वाहत असतात. त्यामुळे वारीसाठी नेमके किती वारकरी येतात़ हे कोणच ठामपणे सांगू शकत नाही. त्यामुळेच शासनाला नियोजन करताना अडचणी येतात, असे वारकºयांनी सांगितले़