मुंबई : सरकारी कचेरीत बसलेला फक्त लाच मागतो हा सर्वसामान्यांचा समज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांमधून चुकीचा ठरू शकेल. सर्वसामान्य ज्याला देव मानतात तो डॉक्टर, न्यायदान करणाऱ्या न्यायालयाचा प्रतिनिधी असलेला वकील, ज्यांच्या जिवावर देशवासीय प्रगतीची स्वप्ने पाहतात ते इंजिनीअर आणि ज्यांच्यामुळे समाज घडतो ते शिक्षक साऱ्यांचेच हात लाचखोरीत बरबटल्याचे धक्कादायक वास्तव एसीबीच्या कारवायांमधून उघड झाले आहे. २०१४मध्ये एसीबीने राज्यातील ३० डॉक्टर, ८७ इंजिनीअर, १२ सरकारी वकील आणि ३० शिक्षकांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे.एसीबीने २०१४मध्ये केलेल्या कारवायांचा अभ्यास केल्यास महसूल आणि गृहविभाग सर्वाधिक भ्रष्ट, लाचखोर असल्याचा निष्कर्ष निघू शकेल. दरवर्षी लाचखोरीत या दोन विभागांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगते. २०१४मध्ये लाचखोरीचा किताब गृहविभागाला मागे सारून महसूल विभागाने पटकावला. एसीबीने ३१ डिसेंबरपर्यंत १,२४५ सापळे रचून लाच स्वीकारणारे शासकीय अधिकारी, लोकसेवक अशा एकूण १,६८१ जणांना गजाआड केले. तर बेहिशोबी मालमत्ता गोळा केल्याप्रकरणी ८९ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. अन्य भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये १२१ जणांवर कारवाई करण्यात आली.बेहिशोबी मालमत्तांची एकूण ४८ प्रकरणे एसीबीने हाताळली. त्यात ८९ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यातले ४६ सरकारी नोकर असून, ३७ जण पहिल्या व दुसऱ्या श्रेणीतले वरिष्ठ अधिकारी आहेत. दुसरे वैशिष्ट्य हे की २०१४मध्ये एसीबीचे सापळे २०१३च्या तुलनेत अडीचपटीने जास्त रचले, बेहिशोबी मालमत्ता गोळा करणाऱ्यांविरोधातील कारवाई तिप्पट तर आणि अन्य भ्रष्टाचार प्रकरणांमध्ये चौपट कारवाई झाली. एसीबीची जबाबदारी प्रवीण दीक्षित यांनी स्वीकारल्यापासून ही यंत्रणा आक्रमक बनली. मनुष्यबळाची चिंता न करता राज्यातल्या जनतेला लाचखोर अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार करण्याची हिंमत दीक्षित यांच्या व्यूहरचनेने मिळवून दिली. तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणे, फोन किंवा एसएमएसवरून तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, तक्रारदार-साक्षीदारांना सुरक्षित ठेवणे, जनजागृती आणि महत्त्वाचे म्हणजे तक्रार मिळताच ताबडतोब कारवाई करणे, या आणि अशा अनेक योजनांनी दीक्षित यांनी सर्वसामान्यांत विश्वास निर्माण केला.आकडे वाढले म्हणजे भ्रष्टाचार वाढला असे नाही. भ्रष्टाचार कालही होता, आजही आहे. तक्रारी वाढल्या. पुढे येऊन तक्रार देण्याची हिंमत वाढली. भविष्यातही सर्वसामान्यांनी लाचखोरांविरोधात असेच निर्भीडपणे पुढे यावे, असे आवाहन दीक्षित नेहमी करतात. (प्रतिनिधी)
एसीबी कारवाईत तिपटीने वाढ
By admin | Published: January 05, 2015 6:28 AM