ठाणे : जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या नावीन्यपूर्ण कामांमध्ये लोकोपयोगी कामांची बहुतांशी जिल्ह्यांत कमी दिसून येत असून ग्रामीण तरुणांच्या स्वयंरोजगारांविषयी नावीन्यपूर्ण कामांची कमतरता असल्याची खंत आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर मात करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तिप्पट साठा तयार ठेवण्याचे सूतोवाच राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मंगळवारी ठाण्यात केले. याशिवाय राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्मृती स्मारक उद्यान उभारणी व शाहू महाराज कार्याची ओळख करून देणारे उपक्रम राज्यभर राबवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोकण विभागीय जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे येथील नियोजन भवनमध्ये मंगळवारी पार पडली. कोकण विभागीय आयुक्त नसल्यामुळे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी त्यांचे स्वागत केले. दहा वर्षांपूर्वी रत्नाकर महाजन यांच्यानंतर प्रथमच ही बैठक पार पडली. यावेळी त्यांनी आनंद दिघे यांच्या कार्याची आठवण झाल्याचे सांगितले.कोल्हापूरनंतर आता कोकणातील जिल्ह्याचा आढावा घेत असून या पद्धतीने राज्यातील सर्वच सहा विभागांमध्ये जिल्हा नियेाजन समितीच्या नावीन्यपूर्ण कामांसह कोरोनाकाळातील उपाययोजनांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या बैठकीला ठाणेसह मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाचा आढावा यावेळी दिला. समाधानकारक काम असल्याचे त्यांनी नमूद केले असले तरी शासनाच्या धोरणानुसार नावीन्यपूर्ण कामांमधील काही कमतरता असल्याची खंत बोलून दाखवली.प्रारंभी कोरोनाच्या गेल्या दोन लाटांमध्ये आलेले अनुभव आणि आता पुढची तयारीविषयी सांगितले. डॉक्टर आणि पोलीस कर्मचारी, आरोग्य विभाग, महापालिका कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या लाटेपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला.
आगीच्या घटनांमधून सरकारची होते बदनामी- कोरोनाच्या दोन लाटांमध्ये ऑक्सिजन जास्त लागला. त्यास अनुसरून तिसऱ्या लाटेसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये आपल्याला साठा तिप्पट तयार ठेवण्याचे आदेशही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. - या कोरोनाच्या कालावधीत हॉस्पिटलला आग लागल्याच्या घटनांमध्येही लोकांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे सरकारची फार मोठ्याप्रमाणात बदनामी होते. यामुळे ऑक्सिजन साठा कमी पडू नये यासाठी नियोजनाच्या सूचना दिल्या.