खामगाव (बुलडाणा) : काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात शेतक-यांना प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दलालांना सामोरे जावे लागत होते. काँग्रेसने शेती व संलग्नीत योजनांवर केलेली तरतूद अपुरी होती. काँग्रेसची धोरणे ही त्यांच्या नेत्यांच्या लॉबींना पूरक असणारी होती, अशी घणाघाती टीका करताना, भाजपाच्या कार्यकाळात आम्ही दलालांची शृंखला नष्ट करून शेतकºयांची तिप्पट प्रगती केली, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला.बुलडाणा जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. मंचावर राज्याचे कृषी व फलोत्पादनमंत्री भाऊसाहेब फुंडकर, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, खा. प्रतापराव जाधव, खा.रक्षा खडसे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, भाजपा सरकारने शेतकºयांच्या हितासाठीच्या धोरणांवर गेल्या ३ वर्षांपासून लक्ष केंद्रित केले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात शेती व शेती संलग्नीत योजनांसाठी अंदाजपत्रकांमध्ये १६ ते २१ हजार कोटींची तरतूद असायची. आम्ही ती ६६ हजार कोटी केली.जलयुक्त शिवार पाण्याचा नियोजनबद्ध वापर, शेतीचे यांत्रिकीकरण, गटशेतीला प्रोत्साहन, अशा योजना राबविल्या. योजनांसाठी आॅनलाइन व्यवस्था कार्यान्वित केली. त्यामुळे दलालाच्या विळख्यातून शेतकरी मुक्त झाला. कृषिमंत्री फुंडकर यांनी गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्याची माहिती दिली. सुमारे १ लाख २५ हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधीत असून, तसा प्रस्ताव केंद्राला पाठविला आहे. लवकरच मदतीचे वाटप सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला जनतेने सत्तेबाहेर टाकले आहे. त्यांनी आता पकोडे तळण्याचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. पुढील किमान १५ वर्षे या पक्षांना जनता स्वीकारणार नाही. त्यामुळे त्यांना पकोडेच तळावे लागणार आहेत.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
काँग्रेसपेक्षा भाजपाच्या काळात शेतकºयांची तिप्पट प्रगती- देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:35 AM