मुंबई : मुस्लीम समाजातील तिहेरी तलाक पद्धतीमुळे महिलांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण होत असल्याचा गंभीर आरोप भारतीय मुस्लीम महिला आंदोलन संघटनेने मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या वेळी पीडित महिलांनी आपली व्यथाही मांडली. दरम्यान, हिंदू आणि इतर धर्मीयांच्या धर्तीवर मुस्लीम महिलांनाही न्याय मिळावा, म्हणून केंद्र सरकारने संसदेमध्ये मुस्लीम कौटुंबिक कायदा पारित करण्याची मागणी संघटनेने केली.गेल्या तीन वर्षांपासून आपण विवाहित आहोत की, घटस्फोटीत हेच माहीत नसल्याचे नालासोपारा येथे राहणारी पीडित सोफिया खान सांगत होती. लग्न झाल्यापासून शारीरिक आणि आर्थिक शोषण होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून पोटगी तर दूरच, घरखर्चासाठी कोणतीही मदत मिळत नाही आहे. अशा परिस्थितीत जगायचे तरी कसे?’ असा सवाल सोफियाने उपस्थित केला आहे.कलिना येथील शास्त्रीनगरमध्ये राहणारी पीडित शबनम खाननेही आपली व्यथा मांडली. लग्नानंतर पहिल्याच आठवड्यात कळाले की, पतीचे आधीच लग्न झाले असून, त्याला दोन मुलेही आहेत. पतीला दारूचे व्यसन असल्याचेही समजले. शारीरिक शोषणाचे व्हिडीओ पतीने काढला. याबाबत वाच्यता केल्यास व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याने अखेर नाईलाजास्तव अन्यायाला वाचा फोडत असल्याचे शबनमने सांगितले. (प्रतिनिधी)हक्काचे काय?महिला म्हणून संविधानाने आम्हाला काही हक्क दिले आहेत की नाहीत? असा सवाल मुंब्रा येथील पीडित नासिरा शेखने उपस्थित केला. पतीने तलाकची भीती दाखवून अनेक अत्याचार केले. अखेर बाळंतपणासाठी माहेरी पाठवले. त्यानंतर दुसरे लग्न केले. आता माझ्या मुलीचे संगोपन आणि माझे काय होणार? संविधानाने आम्हाला काही अधिकार दिले आहेत की नाही? असे अनेक सवाल नासिराने सरकारसमोर उपस्थित केले.
तिहेरी तलाक पद्धतीने महिलांचे शोषण!
By admin | Published: May 03, 2017 4:00 AM