- दादाराव गायकवाड, कारंजा (वाशिम)
गत तीन वर्षांपासून अनियमित आणि अल्प पावसामुळे नद्या आणि जलाशयांमधील जलसाठा कमी होत असल्याने विदर्भातील मासेमारीचा व्यवसाय संकटात सापडला आहे.मासेमारी पहिला प्रकार म्हणजे नदी किंवा तलावात थेट जाळे टाकून मासेमारी करणे, तर दुसरा कंत्राटी पद्धतीने जलप्रकल्पात मत्स्यबीज टाकून त्याचे संगोपन करणे. विदर्भात थेट मासेमारी करणारे दोन समाज आहेत. भोई आणि ढिवर या समाजाची निश्चित संख्या देशात उपलब्ध नसली, तरी विदर्भात या समाजाची लोकसंख्या जवळपास पाच लाखांच्या घरात आहे. विदर्भातील नद्यांमध्ये सुमारे १५०-२०० प्रजातींचे मासे आढळतात. पूर्वेकडच्या जिल्ह्यांमधील नद्यांमध्ये माशांची विविधता जास्त प्रमाणात बघायला मिळते. विदर्भात आढळणाऱ्या दुर्मीळ अशा माशांमध्ये तंबू, कोलशी, खवली, वाडीस, पोडशी, पालोची, बोद इत्यादींचा समावेश होतो. नदीमधून मासळ्यांच्या अनेक प्रजाती लुप्त झालेल्या आहेत. प्रदूषण, मोठी धरणे, तसेच पर्यावरणातील बदलामुळे नद्या मृतप्राय होत आहेत. नद्या शहरांचा मैला वाहून नेणारी गटारं बनल्याने गावरान मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. परिणामी, अनेक कुटुंबांवर उपासमारीची पाळी आली आहे. वर्धा व वैनगंगा दक्षिण वाहिनी असून, त्यांचा उगम मध्यप्रदेशात आहे. गोदावरी खोऱ्यात वैनगंगा, प्राणहिता, पैनगंगा, वर्धा आणि इंद्र्रावती या नद्यांचा, तर तापी खोऱ्यात पूर्णा, मोर्णा, काटेपूर्णा नद्यांचा समावेश होतो. या नद्यांना पाणी नसल्यामुळे थेट भोई व ढिवर समाजावर उपासमारीची पाळी आली आहे.