जितेंद्र ढवळे, नागपूरअर्हताप्राप्त शिक्षकांविना शिक्षण महाविद्यालय चालविणाऱ्या संस्थाचालकांवर बडगा उगारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन ( एनसीईटी) एनसीईटीच्या निर्देशानुसार अटी पूर्ण करणाऱ्या शिक्षण महाविद्यालयांनाच ना हरकत प्रमाणपत्र मिळेल, अशी भूमिका उच्च शिक्षण संचालकांनी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील १५३ शिक्षण महाविद्यालयांच्या प्रवेशाला ग्रहण लागले आहे. या महाविद्यालयांना एनओसी नाकारली तर यंदा हजारो बी.एड., एम.एड., बी.पी.एड. आणि एम.पी.एड. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत येण्याची शक्यता आहे. २१ आॅगस्ट २०१५ रोजी उच्च शिक्षण विभागाने राज्यभरातील विद्यापीठांना पत्र पाठवित शिक्षण महाविद्यालयांना संलग्नीकरण प्रदान करण्यापूर्वी संबंधित महाविद्यालयांनी एनसीईटीच्या निर्देशानुसार अटी पूर्ण केल्या की नाही, याबाबत राज्य सरकारची एनओसी बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. मात्र दरम्यानच्या काळात विद्यापीठाने सीईटी असल्याने काही शिक्षण महाविद्यालयांना संलग्नीकरणाचे पत्रही दिले. शिक्षण संचालकांच्या पत्रानुसार एनओसी देण्यासंदर्भात महाविद्यालयांची चौकशी समित्यांकडून पाहणीही करण्यात आली. याबाबतचा अहवाल विद्यापीठाने शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठविला आहे. मात्र शिक्षण संचालकांच्या पत्रानंतर विद्यापीठाच्या महाविद्यालय शाखेने हा विषय कुलगुरू कार्यालयाकडे पाठवित मार्गदर्शन घेत अशा महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांसंदर्भात कोणती भूमिका घ्यावयाची याबाबत अभिप्राय मागविला होता. मात्र आठ महिने होऊनही शिक्षण संचालकांनी महाविद्यालयाला ना-हरकरत प्रमाणपत्र प्रदान केले नाही. उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी पुन्हा शिक्षण महाविद्यालयांना एनीओसी देण्यासंदर्भात विद्यापीठाला पत्र पाठविले आहे. यात पाच प्रश्नांची माहिती मागविली आहे. त्यामुळे एकच एक माहिती शिक्षण संचालक मागत असल्याने विद्यापीठ प्रशासनही त्रस्त झाले आहे.
एनओसी रोखल्याने हजारो विद्यार्थ्यांचे प्रवेश अडचणीत
By admin | Published: March 21, 2016 3:27 AM