मुंबई : वाइन शॉप सुरू ठेवण्याची अधिकृत वेळ रात्री १०.३०पर्यंत आहे. असे असताना कायद्याचे उल्लघंन करून ठाकूरद्वार नाक्यावरील लीली वाइन शॉप रात्री अकरा, सव्वा अकरापर्यंत सुरु ठेवले जात आहे. या दुकानातून दारूच्या बाटल्या विकत घेऊन दुकानाबाहेर उभे राहून लोक येथे दारू पितात. हे दारुडे येणाऱ्या-जाणाऱ्या महिलांकडे वाईट नजरेने पाहून अश्लील हावभाव करतात. या प्रकारामुळे स्थानिक सध्या कमालीचे वैतागले आहेत. याबाबत अबकारी कर आयुक्तांकडे दीड महिन्यापूर्वी तक्रार नोंदविली आहे. पण, अजून कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. गिरगाव आणि ठाकूरद्वार परिसरातील महिलांना या दारू दुकानाचा अधिक त्रास होत आहे. नोकरदार महिलांना सकाळी चालायला जाण्यासाठी वेळ मिळत नाही. घरची कामे, मुलांच्या शाळेची तयारी यामुळे सकाळी महिलांना वेळ नसतो. त्यामुळे गिरगाव, ठाकूरद्वार परिसरातील महिला गिरगाव चौपाटीवर रात्री पावणे दहाच्या सुमारास चालण्यासाठी जातात. मात्र परतत असताना अकरा - सव्वा अकराच्या सुमारासही हे वाइन शॉप सुरूच असते. ठाकूरद्वार नाक्यावर दारुडे घोळक्याने उभे असतात. वाईन शॉपच्या जवळच एक कचराकुंडी आहे. त्याच कचराकुंडीत रिकाम्या दारूच्या बाटल्या टाकल्या जातात. या सर्व त्रासाला कंटाळून स्थानिकांनी थेट अबकारी कर कार्यालय गाठले. तेथे आयुक्तांना भेटून पत्र दिले. त्यावर तत्काळ कारवाई केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. पण, या गोष्टीला दीड महिना उलटूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे स्थानिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. (प्रतिनिधी)
गिरगावात रात्री ११पर्यंत वाइन शॉपचा त्रास
By admin | Published: May 20, 2016 2:49 AM