मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा रद्द करावा, यासाठी ‘रिपब्लिक टीव्ही’ची मालकी असलेल्या एआरजी आउटलायर मीडिया प्रा. लि. आणि या वृत्तवाहिनीचे मुख्य अर्णब गोस्वामी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बजावलेले समन्स रद्द करण्यासाठी अर्णब गोस्वामी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणीस नकार देत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. गुन्हा रद्द करण्याच्या मागणीबरोबरच मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सीबीआय चौकशी करावी; तसेच सेवा नियमांअंतर्गत पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी, अशीही मागणी गोस्वामी यांनी केली आहे.च्टीआरपी घोटाळ्याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्याने आयपीसी ४०९, ४२०, १२०- बी आणि ३४ अंतर्गत एआरजी आउटलायर मीडिया प्रा. लि. आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर गुन्हा नोंदविला. तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी केली. यामध्ये केबल आॅपरेटर्स, ब्रॉडकास्टर्स, मीडिया एजन्सी, जाहिरातदार आणि अन्य भागधारकांचा समावेश आहे. त्यामुळे याचा तपास संपूर्ण देशभर करावा लागेल.
च् मुंबई पोलिसांनी केलेला तपास पूर्वनिश्चित होता. हे योग्य नाही. कारण याचे टीव्ही इंडस्ट्रीवर वाईट परिणाम झाले आहेत. मुंबई पोलिसांनी अशा प्रकारे तपास करुन चुकीचा पायंडा रचला आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.