डहाणू : येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील सोमटा येथे भिवंडी येथून गुजरातच्या दिशेने कापड घेऊन जात असलेल्या ट्रकला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने भीषण आग लागल्याने लाखोंचे नुकसान झाले. आग लागल्याची माहिती डहाणू तारापूर अग्निशामक दलास देऊनसुद्धा ते वेळेवर न पोहोचल्याने आयआरबीच्या पाण्याच्या टँकरने आग विझविण्यात आली.आज दुपारी भिवंडी येथून अहमदाबादकडे जात असलेल्या या ट्रकला सोमटा येथील आरोग्य केंद्रासमोर शॉर्ट सर्किटने आग लागली. आगीत ट्रकसह ट्रकमधील कापड जळून लाखोंचे नुकसान झाले आहे. हा महामार्ग अरुंद असल्याने कासा पोलीस तसेच चारोटी महामार्ग पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून गुजरातकडे जाणारी वाहिनी बंद करून दुसऱ्या दिशेने पूर्ववत केली. मुंबई-अहमदाबाद हायवेवरून रोज लाखो गाड्या ये-जा करतात, परंतु या राष्ट्रीय महामार्गावर तलासरी ते मनोरपर्यंत अग्निशामक दल व कुठलीही अत्यावश्यक सेवा नसल्याने अनेक अपघात व मोठे नुकसान होऊन जीवितहानीच्या अनेक घटना घडल्या आहे. (वार्ताहर)
शॉर्ट सर्किटमुळे ट्रक रस्त्यातच पेटला
By admin | Published: January 28, 2017 3:52 AM