लातूर : नीट परीक्षेत लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा अभय अशोक चिल्लरगे हा ७०५ गुण मिळवून राज्यात दुसरा आला आहे. जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या अभयचे वडील साधे ट्रक चालक आहेत. वडिल सदैव म्हणायचे, मोठ्या कॉलेजात शिक. तो विश्वास सार्थ ठरवीत अभयने दिल्लीची वैद्यकीय शिक्षणातील सर्वोच्च ‘एम्स’ संस्था गाठली आहे.
मूळ उदगीर येथील चिल्लरगे परिवारातील चार भावंडांत अभय सर्वात लहान. त्याला दहावीत ९६ टक्के गुण होते. किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेत त्याने देशात ८८१ वा क्रमांक मिळवला. तसेच जेईई मेन्समध्येही ९९.५० पर्सेंटाईल मिळविले होते. या आधारे त्याला देशातील कोणत्याही नामांकित एनआयटीमध्ये प्रवेश मिळू शकतो. अभय म्हणाला, महाविद्यालयात सर्वच अभ्यास पूर्ण झाला होता. घरी बसून आॅनलाईन तासिका, सराव परीक्षा हे थोडे नवीन होते. परंतु, जिद्द आणि समोर ठेवलेले ध्येय यश मिळवून देते. आता पहिले ध्येय सर्वोच्च एम्स संस्थेत प्रवेश मिळविणे. मेंदू विकारतज्ज्ञ व्हायचे आहे.