- मुजीब देवणीकरठाणे/औरंगाबाद : चोरीचे ट्रक, हायवा गाड्या विक्री प्रकरणात रविवारी भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी औरंगाबाद महापालिकेतील मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन पक्षाचा नगरसेवक शेख जफर शेख अख्तर याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयात नेण्यात आले. न्यायालयाने त्याला दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पाचशेहून अधिक वाहने या रॅकेटने विकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असून, भिवंडी पोलिसांनी ७० तर औरंगाबाद पोलिसांनी दोन वाहने जप्त केली आहेत. रॅकेटचा मुख्य सूत्रधार गजाआड झाल्याने यात आरोपींची संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मागील पंधरा दिवसांपासून भिवंडी गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप निगडे आणि त्यांचे सहकारी या रॅकेटच्या मागावर आहेत. औरंगाबाद, बीडसह राज्याच्या वेगवेगळ्या भागांत जाऊन पोलिसांनी सखोल तपास केला. शनिवारी ‘लोकमत’ने चोरीचे ट्रक विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली. शनिवारीच औरंगाबाद पोलिसांनी या रॅकेटचा मुख्य सूत्रधार तथा एमआयएमचा नगरसेवक शेख जफर याचा भाऊ शेख बाबर याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापाठोपाठ रॅकेट चालविणारा मुख्य म्होरक्या तथा नगरसेवक शेख जफर याला भिवंडी परिसरातच अटक करण्यात आली.पैशांच्या व्यवहारासाठी तोया भागात आल्याचे तपासअधिकारी निगडे यांनी सांगितले.त्याने चोरीच्या ट्रक प्रकरणातस्वत:च्या खात्यात पैसे मागविलेहोते. या पुराव्याच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून अनेक वाहने जप्त होतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला.असे चालत होते रॅकेट-चिकलठाणा येथे नगरसेवक जफर त्याचा भाऊ बाबर गॅरेज चालवत होते. टाटा बॉडी बिल्डर या नावाने गॅरेज चालत होते. या गॅरेजमध्ये महाराष्टÑासह वेगवेगळ्या राज्यांतील चोरीचे ट्रक आणि हायवा गाड्या आणण्यात येत होत्या. गॅरेजमधील कुशल कारागिरांच्या साह्याने पेंटिंग आणि डेंटिंग करण्यात येत होती.- चोरीचे वाहन अत्यंत नवीन दिसावे अशी किमया हे रॅकेट करीत होते. वाहन तयार करून बीड आरटीओ कार्यालयातून बोगस कागदपत्रांच्या आधारे पासिंगही करण्यात येत होती. नंतर अवाच्या सव्वा दराने वाहन विकण्याचा उद्योग हे रॅकेट करीत होते.
ट्रक चोरी विक्री प्रकरण : एमआयएमचा नगरसेवक शेख जफरला बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2018 5:21 AM