मुंबई : माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही या राहुल गांधी यांच्या विधानवरून गेला पंधरवडा वादावादीमध्ये गेलेला होता. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही त्यामुळे मी माफी मागणार नाही, असं काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात म्हटलं होतं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. फक्त गांधी आडनाव असून चालत नाही. त्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
राहुल गांधी यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करणाऱ्या आणि सावरकरांबाबत आग्रही भुमिका मांडणाऱ्या शिवसेनेला भाजपाने कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. सावरकरांविषयीची भुमिका शिवसेनेने स्पष्ट करावी, मुख्यमंत्रीपदासाठी लाचार झाले, राहुल गांधी यांचा निषेध करून दाखवाच, अशी आव्हाने भाजपाने शिवसेनेला दिली होती. त्याचवेळी हिवाळी अधिवेशन असल्याने उद्धव ठाकरेंना घेरण्याची रणनीती भाजपाने आखली होती.
आज देवेंद्र फडणवीस यांच्या राहुल गांधी यांच्या आडनावावरील टीकेवर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी होय देवेंद्र हे खरे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला आहे. फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रामाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीकाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय. महत्वाचे म्हणजे त्यांनी फडणवीस यांना दिलेल्या उत्तरात उद्धव ठाकरे, शिवसेना यांचे अधिकृत ट्विटर हँडलही टॅग केले आहे. या त्यांच्या विधानावरून वाद होण्याची चिन्हे आहेत. या ट्विटवरून अमृता या ट्रोलही होऊ लागल्या आहेत.
खरंय देवेंद्रजी, फक्त 'ठाकरे' आडनाव असून सुद्धा कोणी 'ठाकरे' होऊ शकत नाही. फक्त आपलं कुटुंब आणि सत्ता या पलिकडे जाऊन लोकांसाठी प्रमाणिकपणे काम करावं लागतं अशी थेट टीकाच त्यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय.