चिपळूण : सर्वसामान्यांचे सरकार असा कांगावा करणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचे खरे रुप देशातील जनतेसमोर हळूहळू येऊ लागले आहे. एकूणच कारभार पाहता हे सरकार भांडवलदारांचे, उद्योगपतींचे असल्याचे लक्षात आले, असे मत राज्य सभेचे खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. काँग्रेसचे खासदार दलवाई बुधवारी चिपळूण येथे आले होते. त्यांनी उत्तर रत्नागिरीतील काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते. दलवाई यांनी भाजपच्या सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसची इतकी दारुण अवस्था कधी झाली नव्हती. शतकोत्तर परंपरा असणाऱ्या या पक्षाला लोकसभा निवडणुकीत फटका बसला. आता कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. सरकारविरोधी दुहेरी लढा देण्याची गरज आहे. त्यासह पक्षाकडून निश्चित ताकद, बळ देण्यात येईल, असा विश्वास दलवाई यांनी व्यक्त केला. केंद्रातील भाजप सरकारने गोरगरिबांकरिता असणाऱ्या हितकारक योजना बंद करण्याचा सपाटा सुरु केला आहे. अन्नसुरक्षा कायद्यासारखी सर्वसामान्यांच्या हक्काची योजना हे सरकार बंद करण्याच्या प्रयत्नात आहे. हे सरकार समाजात मोठ्या प्रमाणात फूट पाडण्याचे काम करीत आहे. भाजपचे खरे स्वरुप हळूहळू पुढे येत आहे. जनतेला आपल्या हक्कासाठी आता जागृत होऊन आंदोलन करावे लागेल. जनता मैदानात उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे दलवाई यांनी सांगितले. यावेळी दापोलीचे मधुकर दळवी, खेडचे अनंत जाधव, गुहागरचे रमाकांत बेलवलकर, चिपळूणचे संदीप सावंत, रामदास राणे, अशोक जाधव, अॅड. शांताराम बुरटे, सुधीर दाभोळकर, जीवन रेळेकर, लक्ष्मण खेतले, रणजित डांगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)जवखेडे येथील दलित हत्याकांडाचा काँग्रेसतर्फे तीव्र निषेध करण्यात आला आहे. आम्ही सर्व तालुक्यात तहसीलदारांना निवेदन देणार आहोत, तर तालुक्यातील सर्वपक्षीय मोर्चात सहभागी होणार आहोत. या हत्याकांडातील दोषींना शिक्षा व्हायला हवी, असे खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले.
भाजपचे खरे रुप जनतेसमोर : दलवाई
By admin | Published: November 06, 2014 9:28 PM