सांगली : केंद्रातील मोदी सरकार जगभरात वेगवेगळ्या पातळीवर ठसा उमटवत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या सरकारपुढेही देशांतर्गत शांतता आणि सौहार्दता जपण्याची महत्त्वाची जबाबदारी असून, ती सरकारने सर्वप्रथम पार पाडली पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत दोन प्रवाहांतील कट्टरवाद्यांपासून सतर्क राहणे आवश्यक आहे, असे मत आॅब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुधींद्र कुलकर्णी यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमानिमित्त कुलकर्णी सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मोदी सरकारने आतापर्यंत चांगली कामगिरी नोंदविली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा वाढणे स्वाभाविक आहे. विद्यमान सरकारने जगभरात स्वत:ची प्रतिमा उंचावण्यास सुरुवात केली आहे, ही स्वागतार्ह बाब असली तरी, देशात निर्माण होत असलेले गढूळ वातावरण हे मोठे आव्हान आहे. त्यामुळे देशातील शांतता, सौहार्दतेचे वातावरण कायम राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. ती ओळखली नाही, तर जगासमोर जाऊन आपण काम करू शकणार नाही. ते म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात वेगवेगळे प्रवाह कार्यरत आहेत. एका प्रवाहाकडून समाज सुधारणेची परंपरा जपण्यात येत आहे. या भूमिकेचे स्वागत करायला हवे. संघाचे मुस्लिमांबद्दलचे धोरणही काही प्रमाणात बदलत आहे. मात्र, याचवेळी संघातील कट्टरतावादी प्रवाहापासून सतर्क राहणे आवश्यक आहे. जे चुकीचे असेल, त्यावर कारवाई झालीच पाहिजे. भारत-पाकिस्तान संबंधाबाबत ते म्हणाले की, दोन्ही देशांतील प्रश्न वाटाघाटीने सुटण्यासारखे आहेत. संबंध सुधारण्यासाठी दोन्ही देशांकडून पुढाकार व प्रतिसाद असल्याने याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. पाकिस्तानमधील नागरिकांनाही भारताशी मैत्रीचे संबंध राखण्यात स्वारस्य आहे. केवळ मोदी सरकारनेच नव्हे, तर मनमोहन सिंग यांच्या सरकारनेही पाकिस्तानशी संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केले होते. (प्रतिनिधी)
मोदी सरकारची खरी जबाबदारी शांतता जपण्याची
By admin | Published: February 02, 2016 4:13 AM