महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या महाविजयानंतर राज्याचा नवा मुख्यमत्री कोण होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र, मुख्यमंत्रीपदाच्या निर्णयासंदर्भात उशीर होत असल्याने, एकनाथ शिंदे नाराज तर नाहीत ना? अशी कुजबूज राजकीय वर्तुळात सुरु होती. यातच, "सत्तास्थापनेचे घोडे कुठेही अडलेले नाही. मी मनमोकळा माणूस आहे. मी कुठेही काहीही धरून ठेवलेले नाही. मी कुठलीही गोष्ट ताणून धरणारा माणूस नाही. मला इतर सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हीच ओळख जास्त प्रिय आहे. मला अडीच वर्षे राज्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यासाठी मी आभारी आहे. भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घ्यावा, त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा झाली. त्यांना मी सांगितले की, सरकार बनवताना माझा कोणताही अडसर येणार नाही, तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल." असे सांगत आज महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्गा काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशस्त केला आहे. यानंतर, शिवसेना प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिंदे यांचे मुक्त कंठाने कौतुक करत प्रतिक्रिया दिली आहे.
केसरकर म्हणाले, "सच्चा शिवसैनिक कसा असतो? हे आज एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतवर्षाला दाखवून दिले आहे. त्यांना जे बाळकडू बाळासाहेब ठाकरे यांनी आणि आनंद दिघे यांनी दिले आहे की, जो आदेश येईल त्या आदेशाचे पालन करायचे आणि त्यावर चालत रहायचे. याचे उत्कृष्ट उदाहरण त्यांनी महाराष्ट्राला आणि संपूर्ण भारताला दाखवून दिले आहे."
"जो नर्णय पंतप्रधान मोदी आणि अमित शाह घेतील तो मला मान्य राहील आणि आपण त्यावर चालत राहू हे त्यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम करत राहू आणि महायुती म्हणून आपण काम करत राहू, हे त्यांनी सांगितले आहे. यामुळे पुढचे निर्णय काय होतात, हे उद्याच्या बैठकीत ठरेल आणि पुढची प्रक्रिया होईल," असेही केसरकर म्हणाले.
हा मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकलेला आहे -केसरकर पुढे म्हणाले, "जे काही बोलले जात होते की, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी अडून बसले आहेत. हा मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकलेला आहे. ते कुठल्याही पदावर अडून राहिलेले नाहीयेत. तसेच, बाळासाहेबांची जी इच्छा होती की, माझा सच्चा शिवसैनिक हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसायला हवा. मग एक शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसल्यानंतर, काय करू शकतो, हे त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतालाही दाखवून दिले आहे." एवढेच नाही तर, "आम्हाला त्यांचा मुख्यमंत्री म्हणून तर अभिमान आहेच, पण त्याहून अधिक अभिमान हा एक सच्चा शिवसैनिक म्हणून आहे," असेही केसरकर यावेळी म्हणाले.